विटा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शुक्रवारी विटा बसस्थानकात आयोजित केलेला स्वच्छता कार्यक्रम शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा कार्यक्रम राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आयोजित केला असून, तो राजकीय कार्यक्रम नसल्याचे सांगत महामंडळाचे अशासकीय संचालक अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी यशस्वी केला. मात्र, निमंत्रण पत्रिकेत नाव असतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सांगलीतील विभाग नियंत्रक दिलीप कदम यांनी या कार्यक्रमाकडेच पाठ फिरविली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शुक्रवारी ‘स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमास विटा येथून सुरूवात करण्यात आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अशासकीय सदस्य अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते व विभाग नियंत्रक दिलीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली विटा बसस्थानकात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापून त्या वितरित करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यामध्ये शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव नसल्याने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता राजू जाधव, बच्चू नागराळे, जॅक सपकाळ, रवींद्र कदम, शेखर भिंगारदेवे, समीर कदम, हेमंत रोकडे, शिरीष शेटे आदी शिवसैनिकांनी प्रोटोकॉल न पाळल्याबद्दल आगारप्रमुख दिलीप पाटील यांना त्यांच्या कार्यालयात घेराओ घातला. त्यांनी हा कार्यक्रम अॅड. मुळीक यांनी आयोजित केला असून, तो संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यामुळे शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. त्यानंतर अॅड. मुळीक यांनी उपस्थित शिवसैनिकांना हा देशपातळीवरचा सार्वजनिक कार्यक्रम असून तो राजकीय नसल्याचे सांगून प्रोटोकॉल काय आहे? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. या कार्यक्रमाला प्रोटोकॉलच उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.या प्रकारानंतर शिवसैनिक निघून गेल्यानंतर विटा बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संचालक अॅड. मुळीक, कामगार नेते बिराज साळुंखे, संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष नाथा रेणुशे, विलास यादव, डेपो सचिव पेंढारी, आगार व्यवस्थापक दिलीप पाटील, स्थानक प्रमुख एच. आर. कोळी, विनायक माळी, कार्यशाळा अधीक्षक पी. एस. शिंदे, दीपक रेडेकर, अॅड. संदीप मुळीक यांनी हातात झाडू घेऊन बसस्थानकाची स्वच्छता केली. (वार्ताहर)पत्रिकेवरील नावे वगळलीविटा शिवसेनेचे बच्चू नागराळे म्हणाले की, विटा बसस्थानकातील स्वच्छता कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आ. अनिल बाबर, नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे नव्हती. विटा आगाराने प्रोटोकॉल पाळला नसल्याचा जाब विचारल्याचे सांगितले.
विटा बसस्थानकातील स्वच्छता कार्यक्रम रोखला
By admin | Published: November 09, 2014 10:52 PM