सांगली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित काम होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तातडीने गांभिर्याने पावले उचलून वाढणारे मृत्यू थांबवावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.जिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्याचवेळी उपचाराविना मरणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसात वाढले आहे.
अशा परिस्थितीत प्रशासनाकडून ज्यापद्धतीने निर्णय होणे अपेक्षित आहे त्यापद्धतीने होताना दिसत नाहीत. ग्रामीण भागामध्ये रुग्णांची वेळेत तपासणी होणे, वेळेत अहवाल देणे या गोष्टी होत नसल्याने संक्रमण वाढत आहे. त्यामुणे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.यावर उपाय म्हणून हंगामी तत्वावर डॉक्टर व परिचारिकांची तातडीने भरती करावी. कोविड रु्रग्णांना ६ हजार ५00 रुपयांऐवजी ३ हजार रुपयांमध्ये चाचणी उपलब्ध करून द्यावी. महात्मा फुले योजनेअंतर्गत सर्व जाचक अटी रद्द करून कोरोना रुग्णांना योजनोचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल, याविषयी प्रयत्न करावेत.
कोरोनावर उपचार घेण्यासाठी परराज्यातून येत असलेल्या रुग्णांना त्यांच्या राज्यातच परत पाठवण्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना कराव्यात. कारण जिल्ह्यातील रु्रग्णांना अगोदर बेड मिळत नाहीत आणि त्यातच परराज्यातून रुग्ण आले तर आपल्या जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होणार आहेत. यावर ठोस उपाययोजना करावी. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यासाठी ५०० बेडचे आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटर असणारे मोठे कोवीड सेंटर उभारण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि महापालिका क्षेत्रातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या तालुक्?यातील तहसीलदार, पोलीस, निरीक्षक तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर सर्व काम करणाऱ्या लोकांची समन्वय समिती स्थापन करावी. कारण जोपर्यंत आपण त्यांच्यावर जबाबदारी देऊन काम करत नाही, समन्वय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या बाबतीमध्ये उपाययोजना करणे अवघड होणार आहे. त्यामुळे समन्वय समिती स्थापन करून रोजच्या रोज त्याचा अहवाल आपल्याकडे मागवून घ्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.