लोकमत न्यूज नेटवर्क
जत : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना कालावधीत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांना देण्यात आले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे मुलांना शाळेत घालणे व ऑनलाइन शिक्षण देणे पालकांना अशक्य झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणतीही खासगी शाळा शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून काढू शकणार नाही. शाळांनी पालकांना शुल्क भरण्यासाठी सहा महिन्याचे हप्ते करून द्यावेत. जत तालुक्यातील काही खासगी शाळा व संस्था शुल्क वसुलीसाठी अन्यायकारक पावले उचलत आहेत. परीक्षेचे ऑनलाइन फॉर्म व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सक्तीने शुल्क वसुली सुरू आहे. अशा शाळेवर कारवाई करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, सक्ती करू नये आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
हेमंत खाडे, सतीश ऊर्फ पवन कोळी, अशोक कोळी, हेमंत चौगुले यांच्या निवेदनावर सह्या आहेत.