फोटो ओळ : सांगली येथे उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
कुंडल : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारा त्रास थांबावावा यासाठी आ. अरुण लाड आणि जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तालुक्यातील युवतींच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून लॉकडाऊन काळात चालू असलेल्या वसुलीसाठी कर्जदार महिलांवर मुद्दलीचे हप्ते व व्याज परताव्यासाठी दबाव आणला जात आहे; परंतु सध्या कोरोनामुळे महिलांना रोजगार नाही. व्यवसाय नाही. या पार्श्वभूमीवर दोन वेळच्या अन्नाचीही भ्रांत असताना हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न महिलांना पडला आहे. तरी शासनाने हा विषय गांभीर्याने विचारात घेऊन तूर्तास कर्ज हप्ते मुदत वाढ द्यावी व व्याज माफ करावे.
यावेळी पलूस तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा नंदाताई पाटील, युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा प्राजक्ता जाधव, पलूस तालुका सरचिटणीस पूजा पवार, युवती राष्ट्रवादी काँग्रेस कुंडल शहर अध्यक्षा वैष्णवी जंगम, मयुरी नलवडे, सुनंदा पाटील व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.