विटा : खानापूर शहरात सध्या अवैध मटका व्यवसायाने चांगलीच गती घेतली असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा मटका व तीन पानी पत्त्यांचा जुगार हा अवैध व्यवसाय तातडीने बंद करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खानापूर शहराध्यक्ष युवराज भगत यांनी केली. याबाबतचे निवेदन तहसीलदार ऋषीकेत शेळके व पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना दिले.
युवराज भगत म्हणाले, कऱ्हाड ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील विटा शहरानंतर खानापूर हे मोठे शहर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तीन पानी पत्त्यांचा जुगार व मटका अड्डे कार्यरत आहेत. खानापूर शहराला सध्या अवैध व्यवसायाचा विळखा पडला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. जे लोक मजुरीवर काम करून थोडेफार पैसे घेऊन येतात, ते पैसे त्यांच्या घरापर्यंत पोहोचतच नाहीत. मटका अड्ड्यावर अनेक लोक मटका खेळून आणलेले पैसे घालवित आहेत. त्यातच अनेक मटका व तीन पानी जुगार अड्ड्यांवर शासनाने घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालनच होत नाही.
त्यामुळे पानटपरीच्या नावाखाली सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर लोकांची गर्दी होत आहे. अड्डे चालविणारे मटका बुकी आणि एजंटांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी युवराज भगत यांनी केली.