लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीतील आयर्विन पुलास लगतच मंजूर असलेल्या पर्यायी पुलाचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शनिवारी भाजपच्या वतीने शिवशंभो चौकात रास्ता रोको करण्यात आला.
आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
भाजपने यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयर्विन पुलास समांतर पूल मंजूर होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. तरीही या पुलाचे काम सुरू झालेले नाही. आयर्विन पुलाची डागडुजी सुरू असल्याने त्यावरून वाहतूक बंद आहे. त्यामुळे बायपास पुलावरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे सांगलीतील मुख्य बाजारपेठेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत आणणे अवघड झाले आहे.
शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. व्यापारी, शेतकरी यांच्यासह सांगलीत येणाऱ्या नागरिकांचीही अडचण झाली आहे.
शिवशंभो चौकात दुपारी साडेचार वाजता रास्ता रोको आंदोलन केले. माजी आमदार दिनकर पाटील हे सांगलीवाडीतील सुमारे शंभरावर कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी समांतर पूल झाला पाहिजे असे फलक लावले. मात्र, त्यावर चिंचबाग व बाजारपेठ वाचवून झाला पाहिजे, अशी मागणी केली होती.
शिवशंभो चौकात रास्ता रोको आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली. शहरात येणारा हा एकच मार्ग सुरू असल्याने याठिकाणी लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलन लवकर संपवण्याचे आवाहन केले.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांच्याशी चर्चा केली. पर्यायी समांतर पुलाचे काम मंगळवारपासून सुरू करण्याची सूचना केली. आराखडा मंजूर आहे, निधी मंजूर आहे. चार-पाच जणांच्या मागणीसाठी पाच लाख लोकांना वेठीस धरू नका, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी गाडगीळ यांनी दिला.
चौकट
दिनकर पाटील यांचा पाठिंबा
माजी आमदार दिनकर पाटील म्हणाले की, समांतर पूल चिंचबागेजवळून जातो. तो पुढे कापडपेठेत गेल्यास बाजारपेठेवर परिणाम होईल. त्यामुळे आयर्विन पुलाच्या दक्षिणेस पूल झाल्यास त्याचा सगळ्यांना लाभ होईल. तसेच पूर्वी मंजूर केल्याप्रमाणे पंधरा मीटरने तो आहे त्या जागी झाल्यास अडचण येणार नाही, मात्र त्याची रुंदी वाढविल्यास चिंचबागेजवळील मैदानास बाधा पोहोचू शकते.