डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथे जत तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या मागण्यांसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करीत जत-सांगली रस्ता तीन तास रोखून धरला. अज्ञातांनी एका एसटीची काच फोडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जत येथे जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडविला व विरोधी घोषणा देत, त्यांना निवेदन दिले. डफळापूर बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. म्हैसाळ योजनेच्या जत तालुक्यातील सर्व टप्प्यांचे काम तात्काळ पूर्ण करावे, प्रत्येक गावाला पाणीपुरवठा करा, रोहयोअंतर्गत काम द्या, शेतकऱ्यांचा कर, कर्जे, वीज बिले माफ करा, जनावरांसाठी चारा व पाण्यासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान, जत तालुक्याचे विभाजन, डफळापूर राष्ट्रीय पेयजलचे काम त्वरित पूर्ण करावे, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केले.सकाळी दहा वाजता डफळापूर बाजारपेठ बंद ठेवून आंदोलक रस्त्यावर उतरले व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जत दौऱ्याप्रसंगी निवेदन देण्याच्या उद्देशाने आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. रास्ता रोकोच्या आंदोलनानंतर पालकमंत्री गाड्यांचा ताफा दुसऱ्या मार्गाने वळवून जतकडे रवाना झाले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी संतप्त होऊन पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. डफळापूरमध्ये झालेले आंदोलन व रास्ता रोको पोलिसांकडून मोडून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी संतप्त आंदोलकर्त्यांमध्ये व पोलिसांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडले. आंदोलकांकडून निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले जतचे नायब तहसीलदार ए. बी. सौदागर व मंडल निरीक्षक एस. ए. कुंभार यांना न जुमानता आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. यावेळी अज्ञातांनी जत डेपोच्या एसटीवर (क्र. एमएच १४ बीटी ०९६४) दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या.या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनकर संपकाळ, जिल्हाध्यक्ष विलासराव देशमुख, महावीर पाटील, राज्य प्रवक्ते महेश खराडे, जत तालुका अध्यक्ष रमेश माळी, राजू पुजारी, विठ्ठल पुजारी, श्रीकांत शिंदे, धोंडिराम चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
डफळापुरात ‘स्वाभिमानी’चा ‘रास्ता रोको’
By admin | Published: March 05, 2016 12:18 AM