मिरज : म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी मिरज-म्हैसाळ उड्डाण पुलावर राष्टÑवादी जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चार दिवसात ‘म्हैसाळ’चे पाणी सोडले नाही, तर सलगरे ते मिरज पदयात्रा काढण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
रास्ता रोको आंदोलनात सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, माजी सभापती अनिल आमटवणे, प्रा. सिध्दार्थ जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, प्रमोद इनामदार, वसंत गायकवाड, खंडेराव जगताप, अण्णासाहेब कोरे, दिलीप बुरसे, गणेश देसाई, संभाजी पाटील, शेतकरी संघटनेचे बी. आर. पाटील, सुभाष खोत, शिवसेनेचे संजय काटे, कपिल कबाडगे, गंगाधर तोडकर, तानाजी दळवी, तुषार खांडेकर, राजेश जमादार, सुजित लकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होते.
मनोज शिंदे म्हणाले, पाण्याअभावी मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात भीषण परिस्थिती आहे. म्हैसाळचे पाणी मिळाले नाही, तर शेती उद्ध्वस्त होणार आहे. आघाडी शासनाने टंचाईतून वीज बिल भरुन पाणी सोडले होते. मात्र भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. रास्ता रोको आंदोलनानंतरही म्हैसाळचे पाणी सोडले नाही, तर सोमवारपासून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत सलगरे ते मिरज पदयात्रा काढून शासनास पाणी सोडण्यास भाग पाडणार असल्याचे मनोज शिंदे यांनी सांगितले.
प्रमोद इनामदार, बी. आर. पाटील, सुभाष खोत यांनीही, तातडीने म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी केली. मोहनराव शिंदे दूध संघ उड्डाण पुलापर्यंत कार्यकर्त्यांनी रॅली काढली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटनेच्या रास्ता रोकोमुळे म्हैसाळ उड्डाण पुलावर वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी तहसीलदार शरद पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.खासदारांचे अभिनंदन : आमदारांवर टीकासिंचन योजनांसाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रूपये निधी मिळविल्याबद्दल खा. संजयकाका पाटील यांचे अनिल आमटवणे व तानाजी पाटील यांनी अभिनंदन केले. मात्र म्हैसाळ योजनेकडे दुर्लक्ष असल्याबद्दल आ. सुरेश खाडे यांच्यावर त्यांनी टीका केली.