सांगली : जिल्ह्यात गेली वीस दिवस लॉकडाऊन सुरू असून, आणखी काही दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. अशा काळात माणसांच्या जगण्याची चिंता केली जात असताना, मुक्या जनावरांचीही केली जावी. मोकाट जनावरांची सध्या उपासमार होत असून ती थांबवावी, अशी मागणी प्राणिमित्र अजित काशीद यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यात सध्या सर्व काही बंद असल्यामुळे कुत्री, मांजर, गाढव, डुक्कर, गायी अशा भटक्या प्राण्यांना खायला मिळणे अवघड झाले आहे. खायला मिळेल, या आशेमुळे नागरी वस्तीत, घराजवळ हे प्राणी येत आहेत. हॉटेल, चिकन-मटण दुकाने, वैरण बाजार व अन्य खाद्यपदार्थांची दुकाने सुरू असताना, खाद्यासाठी हे सर्व प्राणी त्या ठिकाणी थांबत होते, पण लॉकडाऊनमुळे सर्व बंद झाल्याने, तसेच उन्हाळा असल्याने, तहान व भुकेने प्राणी कासावीस होत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे माणसांकडे अगोदर पाहावे लागेल, हे बरोबर आहे, पण त्यातूनही लोकांनी आपल्या आसपासच्या परिसरातील मुक्या जनावरांची थोडी-फार पाण्याची, खाद्याची व्यवस्था करावी, तसेच त्यांना विनाकारण त्रास होईल, अशी वर्तणूक करू नये. महापालिकेनेही याबाबत उपाययोजना करावी, असे आवाहन काशिद यांनी केले आहे.