दत्ता पाटील
तासगाव : पुणदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळजच्या(ता. तासगाव) शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा येथे राज्य मार्गावर दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. या चक्काजामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे आंदोलन चिघळले. पोलिसांनी अजून आंदोलन करतात काही काळ बाचाबाची झाली. नंतर पोलिसांनी आंदोलन करताना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पुणदी योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले होते. मात्र अवघ्या काही तासात हे पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे सावळज भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात आहे. अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत. पाण्याच्या बाबतीत केले जाणारे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बंद केलेले पाणी तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे दोन तास रास्ता रोको केला.
पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस फाटा आंदोलनाचे ठिकाणी दाखल झाला होता त्यांनी आंदोलन करताना रास्ता रोको थांबवण्याची विनंती केली. मात्र अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्यामुळे आंदोलन चिघळले पोलीस प्रशासनाने आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ताजुद्दीन तांबोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील, विवेक सावंत, विनायक पाटील, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलन करताना पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. 'शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर ही गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांना सोडेपर्यत मी पोलीस ठाण्यात ठाण मांडणार असल्याचा इशारा, यावेळी रोहित पाटील यांनी दिला. त्यामुळे पोलीस ठाण्यात देखील बराच वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सावळज बंद पाण्यासाठी सावळजच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच सावळजच्या ग्रामस्थांनी सावळज कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
पोलिसांकडून दहा जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान विनापरवाना रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये राजाराम संभाजी चव्हाण (रा.सिद्धेवाडी), सागर पांडुरंग मोरे (रा.बिरणवाडी), विवेक वसंत सावंत, विनायक बाळासाहेब पाटील, बाळासाहेब तातोबा पाटील, सागर चंद्रकांत पाटील, ताजुद्दीन गुलाब तांबोळी, संजय जगन्नाथ थोरात, संदीप शिवाजी पाटील, यशवंत भीमराव पोळ (सर्व रा.सावळज), यांचा समावेश आहे.