सोनहिरा हरपला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:19 AM2018-03-10T00:19:16+5:302018-03-10T00:19:16+5:30

डॉ. पतंगराव कदम शेतकरी कुटुंबातील सात भावंडांपैकी ते एक; संपूर्ण कुटुंब त्यांनी नावारूपाला आणले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे काम केले, तसेच काम सहकारात केले. त्यांनी साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँक, सहकारी बझार उत्तम चालविले.

The storm called Patangrao was shaken | सोनहिरा हरपला !

सोनहिरा हरपला !

Next

वसंत भोसले -

डॉ. पतंगराव कदम शेतकरी कुटुंबातील सात भावंडांपैकी ते एक; संपूर्ण कुटुंब त्यांनी नावारूपाला आणले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे काम केले, तसेच काम सहकारात केले. त्यांनी साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँक, सहकारी बझार उत्तम चालविले. राजकारणी म्हणून तर ते अनेक वर्षे धडाडत राहिले. या माणसाचे पाय मात्र नेहमी एकाच ठिकाणी थांबले नाहीत. वादळाप्रमाणे त्यांचा कामाचा झंजावात चालू असायचा. हे वादळ अखेर शमले आहे.

पतंगराव कदम यांच्या मागील वाढदिवसाच्यानिमित्ताने (दि. ८ जानेवारी २०१८) त्यांना दूरध्वनी केला. तोच नेहमीचा उत्साह, तोच प्रेमाचा ओलावा, तोच जिव्हाळा! ‘वसंतराव, मित्राला कसल्या शुभेच्छा देताय, त्या तर कायमच आहेत, बोला!’
पतंगराव कदम नावाच्या वादळाच्या मुखातूून ऐकलेले ते शेवटचे शब्द ! ८ जानेवारीचा आपला वाढदिवस एखाद्या लहान मुलाप्रमाणे हौसेने शुभेच्छा स्वीकारीत साजरा करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा तो खेळकरपणा एखाद्या मुलासारखा वाटे. सार्वजनिक काम करताना नेटाने पुढे राहणारे ते कणखर नेतृत्व वाटे. शिक्षणाविषयी तरी ते वेगळेच पतंगराव होते. त्यांच्या राजकारणाविषयी नेहमीच चर्चा होते; पण ते खरे शिक्षण प्रचारक होते. कोल्हापूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर गेल्याच आठवड्यात भेटले होते, तेव्हा पतंगराव कदम यांच्या प्रकृतीचा विषय निघाला. अखंड धडपडणारा शिक्षण प्रचारक, राजकारणी आणि समाजसेवक अशा अवस्थेतून जातो आहे, असे सांगत ते म्हणाले, ‘सोनसळसारख्या खेड्यातून पुण्यात येताना हा माणूस उराशी स्वप्नच घेऊन आला होता. हडपसरच्या साधना विद्यालयात मी काम करायचो. सन १९६५-६६ ची गोष्ट असेल. सोनसळचा कदम नावाचा तरुण पोºया आला आहे. तो ड्रॉइंगचा शिक्षक म्हणून कार्यरत राहील, असे सांगण्यात आले. आमच्याशी बोलताना ते ‘ मी एक दिवस मोठा होणार आहे. शिक्षण संस्थाच काढणार आहे. आयुष्यभर शिक्षकी पेशा करणार नाही. राजकारणात उडी मारणार आहे’ असे नेहमी म्हणत. हे ऐकून थोडंसं चमत्कारिकच वाटायचं; कारण त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती मात्र यशवंतराव मोहिते यांनी परिवहनमंत्री असताना त्यांची एस. टी. महामंडळाच्या संचालकपदावरच नेमणूक केली. त्यांनी हडपसर विद्यालय सोडले तसे आम्ही त्यांच्या वाढत्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहतच राहिलो.’

सुरेश शिपूरकर यांच्याशी बोलतानाची ही आठवण आणि पत्रकार म्हणून गेली तीस वर्षे त्यांना जवळून पाहताना त्यांची सातत्याने चाललेली धडपड पाहिली की, ते एक वादळच होतं, आता ते शमलं आहे, असेच म्हणावे लागेल. प्रचंड उत्साह, नेहमी कामात राहणे, नेहमी धावत राहणे, राजकारण करीत असताना गावचे हित, जिल्ह्याचे हित पाहणे याबरोबरच राज्याचे राजकारण ते करीत आले. विद्यार्थिदशेत फीमध्ये दीड रुपया सवलत मिळावी म्हणून बत्तीस वेळा प्राचार्यांच्या दालनात जाऊन आलेले ते आता वर्षाला भारती विद्यापीठाच्या १८८ शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना साडेचार कोटी रुपयांची फी-सवलत देत होते. त्यांनी डॉक्टरेट केली. भारती विद्यापीठ शिक्षण संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याने ते संस्थापक-कुलपती झाले. ते पद तहहयात होते. ते सहा वेळा आमदार झाले. अठरा वर्षे मंत्री म्हणून महाराष्ट्रभर काम करीत राहिले.

हा सर्व चमत्कार डॉ. पतंगराव कदम यांच्यासारख्या एका व्यक्तीकडून कसा होऊ शकतो? याचं मला नेहमीच कोडं पडलं होतं. ‘माझ्या संस्थेत नोकरीला घेताना मी एक कप चहाच्या मिंद्यात आहे, असं कोणीही सांगावं,’ असे ते जाहीरपणे आव्हानात्मक बोलत राहायचे. एवढे प्रचंड धाडस कोठून यायचे माहीत नाही. १९९५ मध्ये ते निवडणुकीत हरले. दुसºया दिवसापासून पुन्हा आपल्या कामाला लागले. ‘निवडणुका येतात, जातात. हार-जित व्हायचीच. इंदिरा गांधी हरल्या होत्या, तेथे या पतंगरावाचं काय?’ असा सवाल करीत ‘परत निवडणूक येऊ द्या, लढवायची, जीवनाच्या अखेरपर्यंत ही लढाई चालूच राहणार,’ असे ते म्हणायचे. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. ‘काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस’ अशी त्यांच्या मतदारसंघात मुख्य लढत होती. कृष्णा नदीवरील औदुंबरच्या दत्तमंदिराच्या परिसरात प्रचाराचा नारळ फोडला जात होता. पतंगराव कदम यांचे त्यावेळचे भाषण हे त्यांच्या राजकीय, सार्वजनिक जीवनाचा मथितार्थ सांगणारे होते ‘अरे, एक निवडणूक हरलो म्हणून काय झालं? एका लुगड्यावर बायको म्हातारी होत नाही, तिला वारंवार लुगडं घ्यावं लागतं,’ असे ते बिनधास्त बोलत होते. ‘ही लढाई जिंकणार आणि मागची चूक पुन्हा होऊ देणार नाही. परत हा पतंगराव पराभवाचं तोंड पाहणार नाही,’ असे सांगत त्यांनी सभा जिंकली. त्यानंतर पुुन्हा त्यांनी पराभव पाहिला नाही.

सांगलीतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. उमेश जोशी यांचे वडील पतंगरावांच्या वर्गात (बहुधा चौथीतील) होते. एकदा मंत्री असताना ते भेटायला गेले. सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील उमेशच्या दवाखान्यासमोर जाताच त्यांना बघून जणू आपणच चौथीच्या वर्गात आहोत, अशी त्यांनी मिठी मारली आणि दोघेही अरे-तुरे बोलत दहा मिनिटांसाठी आलेले, पण तासभर गप्पा मारल्या.

पतंगरावांच्या राजकारणाची चर्चा होते. मात्र ते खरे शिक्षण प्रचारक होते. काम नेटाने करण्यास त्यांचे कायम प्राधान्य असायचे. ते आमदार असोत की नसोत, मंत्री असोत किंवा नसोत; शिक्षण क्षेत्रातील कार्यात केव्हाही खंड पडणार नाही, याची नेहमीच दक्षता ते घेत राहिले. खेड्या-पाड्यांतील मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी जे काही करता येईल, त्यासाठी कष्ट घेण्याची त्यांची नेहमीच तयारी असायची. आता जाणवते की, त्यांची लौकिकार्थाने शारीरिक उंची कमी असेल; पण झाड पडल्यावर कळते की ते किती उंच होते, तसे आता जाणवते आहे.

जयंतराव टिळकांचा सल्ला अन् दहा हत्तीचे बळ
पुण्यात एका बोळातील एका खोलीत भारती विद्यापीठ सुरू केले, तेव्हा त्यांना हिणवलं जायचं की, बोळातील विद्यापीठ, बोळातच संपणार! तेव्हा ते अस्वस्थ झाले. केसरीवाड्यात जयंतराव टिळक यांना भेटायला गेले. त्यांना लोकांच्या प्रतिक्रिया सांगितल्या. टिळक म्हणाले, ‘लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत काम करत राहा.’ तसेच केले. विद्यापीठ नावारूपाला आले. ते ‘अभिमत’ही झाले. ते एका ड्रॉइंग शिक्षकापासून कुलपती झाले. जयंतराव टिळक यांचे निधन झाले तेव्हा ते कोल्हापूरचे पालकमंत्री होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक चालली होती. ते बोलत होते. एकाने कानात त्यांना जयंतराव टिळकांच्या निधनाची वार्ता सांगितली. त्यांनी त्याच क्षणी सभा तहकूब केली, श्रद्धांजली वाहिली आणि तडक पुण्याकडे जाण्याची तयारी केली. हेलिकॉप्टर मागविले. ते मुंबईहून कोल्हापूरला येईपर्यंत त्यांना धीर नव्हता. हेलिकॉप्टर साताºयात पोहोचले. त्यांनी तेथे ते उतरविले आणि तिथून ते टिळक यांच्या अंत्यसंस्कारास पोहोचले.

या सर्व गडबडीच्या प्रवासाविषयी त्यांना एकदा विचारले तेव्हा त्यांनी मागे वळून आठवण सांगितली, ‘भारती विद्यापीठ काढल्यावर लोक जे बोलत होते, तेव्हा विद्यापीठ बंद करून शिक्षकी पेशाच करावा, असे वाटण्याइतपत नैराश्य आले होते; पण ‘लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर, काम करीत रहा,’ हा जो सल्ला त्यांनी दिला, त्यावेळी मला दहा हत्तींचे बळ आल्यासारखे वाटले. आयुष्यात त्यांचा एकच सल्ला मला उत्तुंग शिखरावर घेऊन जाण्यास मार्गदर्शक ठरला. त्यांना मी कसा विसरू?’ अशी त्यांची मागे वळून पाहण्याची पद्धत होती.

Web Title: The storm called Patangrao was shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.