मिरज : बेडग (ता. मिरज) येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रविवारी रात्री लावणीच्या कार्यक्रमात मोठ्या गर्दीत तुडवले गेल्याने दत्तात्रय विलास ओमासे (वय ४४, मूळगाव यड्राव, इचलकरंजी, सध्या रा. बेडग) यांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला. शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांनी शाळेच्या कौलांचा चुराडा केला.बेडग येथे गजराज कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे रविवारी सत्कार समारंभ व सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे उपस्थित होते. सत्कार कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री खाडे निघून गेले. त्यानंतर गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम सुरू झाला. नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून व बाहेरून मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली होती. शाळेच्या पटांगणात प्रचंड गर्दी झाल्याने काही प्रेक्षकांनी शाळेच्या कौलारू छतावर जाऊन नृत्याचा ताल धरत कौलांचा चुराडा केला.
यावेळी एका झाडावर प्रेक्षक बसले होते. ते झाडही कोसळले. आयोजकांनी सूचना देऊनही प्रेक्षक ऐकत नव्हते. अचानक मैदानावर प्रचंड गर्दी उसळली. त्यातील अनेकजण नाचू लागले. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्या गर्दीत तुडवले गेल्याने दत्तात्रय ओमासे यांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मुख्याध्यापकांचे बेभान नृत्यया लावणी कार्यक्रमात मिरजेतील महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांनी बेभान होऊन लावणीच्या तालावर नृत्य केले. मुख्याध्यापकांचा नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत लावणी व डीजेच्या तालावर नृत्य व गर्दीत चेंगरून एकाच्या मृत्यूप्रकरणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कांबळे यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या लावणी कार्यक्रमात बिभत्स नृत्य केल्याचा आरोपही एमआयएमने केला आहे.