अविनाश कोळीसांगली : पिढ्यान् पिढ्या कष्टाची भाकर खाऊन परंपरेची वाट धरणाऱ्या कारागिरांना आधुनिक युगाच्या लाटेत तरण्याची कसरत करावी लागते. दगडांच्या साधनांची गरज आधुनिक युगाला नसली तरी संघर्षाचं जातं त्यांना फिरवावंच लागतं. जात्यावरचं दळण, त्यावरची गाणी कालबाह्य झाली, मात्र ‘शो पीस’ म्हणून ही जाती बंगल्यांच्या कोपऱ्यात, अंगणात सजू लागली आहेत.
धुळ्यातील सुनील धोत्रे यांचं कुटुंब दगडांसोबतचा संसार घेऊन सध्या सांगलीच्या माळबंगला परिसरात आलं आहे. परंपरेनं त्यांना जे शिकवलं तेच पुढं नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरं काही शिकायला मिळालं नसल्यानं कारागिरी हेच पोट भरण्याचं एकमेव साधन त्यांच्याकडं आहे. भरउन्हात दगडाला आकार देत जातं, पाटा, खलबत्ता, उखळ, अशा वस्तू ते तयार करतात. जात्यावरचं दळण केव्हाच कालबाह्य झालं. पाठोपाठ उखळ, खलबत्ता, पाटाही त्याच मार्गानं जात आहे. तरीही या वस्तू तयार करण्याची त्यांची धडपड अनेकांना अनाकलनीय वाटत आहे.
दगडी जात्याचं ‘शो पीस’
जुन्या काळात संसाराचा अविभाज्य भाग असलेलं दगडी जातं आता नव्या युगात ‘शो पीस’ म्हणून वापरलं जात आहे. श्रीमंत लोक, हॉटेलचालक, फार्महाउस असलेले पुढारी यांच्याकडून जातं खरेदी केल्याची बाब कारागिरानं सांगितली. बैलगाडी, जुने लाकडी पलंग, देवळी, कंदील यांच्या माध्यमातून वेगळा लूक हॉटेल व घरांना देण्यात येत आहे. त्यात आता जात्याची भर पडत आहे.
गावापासून दूर का जावं लागतं
गावात त्यांच्यासारखे आणखी कारागीर असल्यानं व आधीच व्यावसाय कमी झाल्यानं जिथं असे कारागीर कमी आहेत त्याठिकाणी पाथरवट कुटुंबाला जावं लागतं.
बाडबिस्तारा गुंडाळायला साडेचार तास
दगडी वस्तूंसह संपूर्ण बाडबिस्तारा गोळा करण्यासाठी अशा कुटुंबांना तब्बल साडेचार तास लागतात. जगण्यासाठी ही कसरत तर काहीच नाही, असं धोत्रे सांगतात.
असे आहेत दर
जातं ७५०-१२००
पाटा ३५० ते ४००
खलबत्ता ३००
उखळ ३५०