दोस्तीमुळे अस काही केलं की....वायफळेतील जीवलग मित्रांची कहाणी प्रसिध्दीपासून दूरच
सांगली : वायफळे (ता. तासगाव) येथील आरोग्यसेवक दत्तात्रय पाटील यांनी आपल्या व्यसनी मित्राच्या चार मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या कपड्यांसह बारावीपर्यंतच्या शैक्षणिक खर्चाची सर्व जबाबदारी घेतली आहे. एवढे सर्व करुन त्याने मित्राकडे व्यसन सोडण्याची एकच कळकळीची विनंती केली आहे. या दिलदार मित्राची कहाणी अंगावर शहारे आणणारीच आहे. आरोग्य सेवकांना तुटपुंजा पगार असतानाही आपल्या मित्राचा संसाराचा गाडा सुरळीत चालविण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न तरुणांसमोर मोठा आदर्शच आहेत.
दत्तात्रय पाटील आणि त्यांचे मित्र तसे बालपणापासून एकत्र राहिले आहेत. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दोघांनी गावातच घेतले. दोघेही दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. दत्तात्रय पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे आरोग्यसेवक पदाची नोकरी स्वीकारली. मित्रालाही चांगले गुण असल्यामुळे त्याने चांगल्या गुणांनी १९८९ च्या दरम्यान आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. वास्तविक पाहता, त्यावेळी आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत होत्या. दत्तात्रय पाटील यांच्या मित्रालाही तशी चांगली नोकरी मिळालीच असती. पण, मित्रास संगत व्यसनी लोकांची लागली आणि तिथेच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तो दारूच्या आहारी गेल्यामुळे कुटुंबीयांकडेही दुर्लक्ष झाले.
लग्न झाले आणि वंशाच्या दिव्याची वाट पाहत जवळपास पाच मुलींचा जन्म झाला. मुलीच वंशाचा दिवा असल्याचे सांगून मित्र दत्तात्रय पाटील यांनी त्याचे खूप प्रबोधन केले. तरीही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. दोन मुलींवर नसबंदी करण्याचा सल्लाही दिला. त्यावेळी फक्त हो... म्हणणार आणि त्यानंतर पुन्हा दोघे मित्र कधीच लवकर भेटत नव्हते. आता मात्र नसबंदी करण्याचे मित्राने मनावर घेतले आहे.
सध्या दत्तात्रय पाटील यांच्या मित्र्याच्या घरी अठराविश्व दारिद्र्य आहे. मिळेल तिथे तो कामाला जातो. पण, हातात येईल तेवढे पैसे व्यसनावर उधळत असल्यामुळे कुटुंबीयांच्या वाट्याला आर्थिक संकट आले आहे. मित्राची ही हालाकी दत्तात्रय पाटील यांच्यावर कानावर पडली. लगेचच त्यांनी मित्राचे घर गाठले आणि आता तरी व्यसन सोड, चार मुलींची तू काळजी करू नकोस, त्या सर्व मुली मी दत्तक घेतो. त्यांचे बारावीपर्यंतचा शैक्षणिक आणि कपड्यांचा सर्व खर्च मी करतो. पण, तू दारू सोड, अशी कळकळीची विनंती त्यांनी मित्राकडे केली. मित्राने हो... तरी म्हटले आहे. पाहूया यापुढे तरी मित्राचे डोळे उघडतात का ते!दत्तात्रय पाटलांच्या कामगिरीला सलामदत्तात्रय पाटील जिल्हा परिषदेकडे साधे आरोग्यसेवक म्हणून नोकरी करीत आहेत. मिळणाºया पगारातून कुटुंब चालविताना कसरत होते. पण, अंगातच सेवाभावी आणि मदतीची वृत्ती असल्यामुळे सर्वांना मदतीसाठी नेहमी धावून जाणे, हा त्यांचा स्वभाव आहे. मित्राच्या मुली दत्तक घेतल्याची माहिती देता देता त्यांनी, २०१३ पासून ग्रामीण भागातील मुले शिकली पाहिजेत, म्हणून वायफळेतील हायस्कूलच्या ४०० आणि जिल्हा परिषद शाळेतील २५० मुलांना प्रत्येकी पाच व'ा आणि पेन देत असल्याचे सांगितले.
हा उपक्रम गेली सात वर्षे अखंडितपणे करीत असल्याचे त्यांनी सहज सांगितले. या उपक्रमाबद्दल त्यांनी कधीच प्रसिध्दीचीही इच्छा व्यक्त केली नाही. समाजात चार वह्या वाटून बातम्या प्रसिध्द करणारे बरेच आहेत. पण शालेय मुलांच्या शिक्षणासाठी हजारो रुपये खर्च करूनही दत्तात्रय पाटील हा साधा कार्यकर्ता मात्र प्रसिध्दीपासून दूरच राहिलेला आहे.