भिलवडी : ताकदीपेक्षा आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा असतो. म्हणूनच अनेकदा शरीराने लहान असलेले अनेक प्राणी अजस्त्र प्राण्यांशी पंगा घेऊन त्यांना पराभूतही करीत असतात. असाच पंगा एका बगळ्याने अजस्त्र मगरीशी घेतल्याची घटना आमणापूर (ता. भिलवडी) येथे घडली.पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील तांबटावर एक मगर सकाळचे कोवळे ऊन घेत पहुडलेली होती. काही वेळात तिची डुलकीही लागली. इतक्यात कुठून एक बगळा तिच्या पाठीवर येऊन बसला. बसला तो बसला, पण तिला टोच्याही मारू लागला. झोपमोड होताच मगरीने क्षणार्धात मान उंचावत आपला अजस्र जबडा पसरला. आता सगळ्या फारूळ्या दातांचे सुळे चमकायला लागले. बगळाही सावधपणे हरकतीत आला. आता ही मगर बगळ्याची न्याहरी करेल, असे वाटत असतानाच जबडा बंद करीत ती पुन्हा घोरत पडली. बहुदा रात्री पोटभर शिकार मिळाली असावी. पण बगळ्यासमोर दहशतीचा प्रयोग चालत नसल्यानेच मगरीनेही तिच्यासमोर मान झुकविली.
बगळ्याने मोडली अजस्त्र मगरीची झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:38 PM