लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांना परवाने दिले जात आहेत. फेरीवाल्यांनी आत्मनिर्भर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.
दयानंद हॉकर्स युनियनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात आयुक्त कापडणीस बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, पृथ्वीराज पवार, नगरसेविका भारती दिगडे, स्वाती शिंदे, रेखा पाटील, अनिल शेटे उपस्थित होते. यावेळी फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि परवान्याचे वाटप करण्यात आले. युनियनच्यावतीने स्पर्धा परीक्षेची पुस्तके देऊन आयुक्तांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिकेकडून फेरीवाला धोरणाची काटेकोरपणे अंमलबाजवणी केली जात आहे. यामध्ये जे फेरीवाले महापालिकेकडून परवाना घेतील ते अधिकृतपणे व्यवसायधारक बनणार आहेत. फेरीवाल्यांकडून घेतलेल्या शुल्कातून त्यांच्यासाठी सोयी-सुविधा दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आयोजन दयानंद फास्टफूड संघटनेचे सुरेश टेंगले यांनी केले. यावेळी अस्लम शेख, हेमंत गोताड, विलास गडदे, राजू जावळीकर, संतोष नरळे, संतोष काकडे, प्रदीप माणगावकर, अनिल धुमाळे, बाळू घोडके उपस्थित होते.
फोटो ओळी : दयानंद हाॅकर्स युनियनच्यावतीने महापालिकेच्या पुस्तक बँकेसाठी पुस्तके भेट देऊन आयुक्त नितीन कापडणीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले, अनिल शेटे, संजय बजाज, पृथ्वीराज पवार, भारती दिगडे उपस्थित होते.