अशोक पाटील - इस्लामपूरग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात इस्लामपूरमधून नक्की कोण थांबणार, हे अद्याप अनिश्चित आहे. नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, सदाभाऊ खोत यांच्या नावांची केवळ चर्चाच असून त्यांनी आतापर्यंत भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मतदारसंघातील हालचाली थंड आहेत. याउलट शिराळा मतदारसंघात विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांना महायुतीतर्फे शिवाजीराव नाईक यांनी आव्हान उभे केल्याने येथे काट्याची टक्कर पहावयास मिळणार आहे. दरम्यान, शिराळ्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सत्यजित देशमुख यांना आघाडीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याचे समजते.इस्लामपूर मतदारसंघ राष्ट्रवादीचा हुकमी मतदारसंघ असून यावेळीही येथे ग्रामविकासमंत्री पाटील यांचीच उमेदवारी राहील. त्यांच्या विरोधात महायुतीतून लढण्यास इच्छुक असणारे नानासाहेब महाडिक मात्र सध्या थंडावले आहेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगोला किंवा शाहुवाडी या दोन मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. तेथे उमेदवारी न मिळाल्यास ते इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारीचा विचार करतील.हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत केली. मात्र मतदारांनी काँग्रेसला नाकारले. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी नायकवडी यांनी सावध भूमिका घेतली आहे.याउलट शिराळा मतदारसंघात विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. आ. नाईक यांनी मुंबई वाऱ्या करून उमेदवारी निश्चित केली आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सत्यजित देशमुख यांना आघाडीचा धर्म पाळण्याचा आदेश दिल्याचे समजते. मात्र त्याचा त्यांनी इन्कार केला आहे. शिवाजीराव नाईक यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’कडून महायुतीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येथे काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे.
इस्लामपुरात थंड हालचाली, शिराळ्यात काट्याची लढत
By admin | Published: July 21, 2014 11:47 PM