सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती आटोक्यात असली तरी प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळण्याबराेबरच सोशल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर बंधनकारक आहे. बुधवारपासून विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
अधीक्षक गेडाम यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण कमी होत असले तरी राज्यातील काही भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनेकजण विनामास्क फिरत असल्याने संसर्गाचा धोका वाढणार आहे. त्यामुळे आता मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासह बाजारपेठेसह इतर ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारपासून सर्वत्र विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून, ती यापुढेही सुरूच राहील, असेही गेडाम यांनी सांगितले.