शिरढोण : म्हैसाळ योजनेच्या कालव्यावरील पाण्याचे दरवाजे उघडल्यास कडक कारवाई करण्यात येवून गुन्हे दाखल करावेत. तसेच या योजनेवरील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून शासनाला सहकार्य करण्याचा निर्णय कवठेमहांकाळ येथील बैठकीत घेण्यात आला.
म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व म्हैसाळ योजनेचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक पंचायत समितीमध्ये पार पडली.
द्राक्षबागा गेल्यानंतर तसेच ऊस तुटल्यानंतर पाण्याची गरज असताना शेतकरी मात्र पाणी मागणीचे अर्ज द्यायला तयार नाहीत. पाणीपट्टीही भरायला राजी नसतात. अशा संकटात म्हैसाळ योजना सापडली होती, पण जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील आणि राजकीय पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून म्हैसाळ योजना सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष टी. व्ही. पाटील यांनी सांगितले. पाणी मागणी अर्ज नसल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले नव्हते. आता पाणी सुरू झाले असून, शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरावी, असे आवाहन उपअभियंता राजेंद्र हिंगमिरे आणि मिलिंद मोरे यांनी केले. यावर बैठकीतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी प्रबोधन करण्याची भूमिका घेतली.
काही शेतकरी कालव्यावरील गेट तोडून पाणी नेतात, अशी तक्रार अधिकाऱ्यांनी केली. यावर बैठकीमधील कार्यकर्त्यांनी ज्यांनी गेट उघडले असतील, त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी अधिकाऱ्यांनी गेट उघडणाऱ्यांची नावे दिल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा दिला. कालव्यावरील इलेक्ट्रिक मोटारी, ओढे-नाल्यामधून सोडण्यात येणारे पाणी यावरील पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला सभापती विकास हाक्के, राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील, एम. के. पाटील, दत्ताजीराव पाटील, हायुम सावनूरकर, मारुती पवार, दादासाहेब कोळेकर, संजय चव्हाण, अनिल पाटील, सुहास पाटील, ईश्वर पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.