सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही भागात वाढ होत आहे. नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सरू करण्यात यावेत. होम आयसोलेशनमध्ये ते रुग्ण राहिल्यास घरातील इतर व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता असते. जे रुग्ण व त्यांचे नातेवाईक संस्था क्वारंटाईन होण्यास विरोध करतील, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले.
कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या भागातील ग्राम समिती सदस्यांशी अधीक्षक गेडाम यांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचेही आवाहन केले.
अधीक्षक गेडाम म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी त्यांना विलगीकरणात ठेवले गेल्यास उपचारासह संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या नियंत्रित राखण्यासाठी गाव पातळीवरील समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी अधीक्षक गेडाम यांनी सर्व सनियंत्रण समिती सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करीत त्यांच्याही अडचणी जाणून घेतल्या.