सांगली : जिल्हा बँक सध्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत; पण तिला आणखी सक्षम करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी प्रसंगी बड्या कर्ज थकबाकीदारांवर कठोर कारवाई करू, असा इशारा बँकेचे नूतन जिल्हाध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते, पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व शिवसेना नेते आ. अनिल बाबर यांच्या सहकार्याने या पदावर संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग बँकेच्या भल्यासाठी केला जाईल. गेल्या सहा वर्षांत बँकेने आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. मावळते अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी त्याबाबतची आकडेवारीही जाहीर केली आहे. बँकेला त्यापुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करू.
जिल्हा बँकेच्या सक्षमतेसाठी आम्ही नियोजन आराखडा तयार करणार आहोत. बड्या ३० थकबाकीदार संस्थांची यादी घेऊन त्यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केले जातील. कोणत्याही परिस्थितीत बँकेचा एक रुपयासुद्धा बुडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. सुरुवातीला सामंजस्याने चर्चेतून वसुली करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यातून काही साध्य झाले नाही, तर कठोर पावले उचलण्यासही आम्ही मागे-पुढे पाहणार नाही. संस्था कोणाच्या आहेत, हे न पाहता बँकेची वसुली कशी होईल, याकडे आमचे लक्ष राहणार आहे. ताब्यात असलेल्या संस्थांची कायदेशीररीत्या लिलावाद्वारे विक्रीचाही पर्याय आहे.
जिल्हा बँकेत काम करताना सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहे. प्रत्येकाला सडेतोडपणे मत मांडण्याची मुभाही माझ्या कारकिर्दीत राहणार आहे. विश्वासाचे नाते त्यामुळे बळकट होईल.
चौकशीच्या मुद्द्यावर ठाम
जिल्हा बँकेच्या मागील काही वर्षांतील कारभाराबाबत मी चौकशीची मागणी केली होती. त्याबाबत आजही मी ठाम आहे. बँकेमार्फत त्या गोष्टींची माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य भूमिका मांडू, असे नाईक म्हणाले.
विश्वास समूहाचा पॅटर्न राबविणार
शिराळ्यात विश्वास समूहातील संस्था ज्या पद्धतीने चालविल्या आहेत तो पॅटर्न जिल्हा बँकेत राबविण्यात येईल. अनावश्यक खर्च टाळून बँकेच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.