लोकमत न्यूज नेटवर्क
नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथिल ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत कोविड लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दक्षता समितीचे सचिव तलाठी आर.आर. कारंडे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना मांडल्या.
यावर चर्चा होऊन येत्या शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता गावामध्ये संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावची लोकसंख्या नऊ हजारांवरती असून यातील ४५ वर्षांवरील
व्यक्तींची संख्या सहा हजार आहे. प्राथमिक
आरोग्य उपकेंद्रातून लसीकरण मोहीम राबविण्याचा ठराव करण्यात आला.
सकाळी ७ ते १० या वेळेतच किराणा माल उघडण्यास परवानगी
असतांना वाड्या- वस्त्यांवर याचे उल्लंघन
होत असल्याची बाब तलाठी कारंडे यांनी समोर आणली. यावर तातडीने कारवाई करण्याचा निर्णय दक्षता समितीने घेतला.
बैठकीसाठी सरपंच राणी
नागरगोजे, ग्रामसेविका उज्ज्वला आवळे, ग्रामपंचायत सदस्य मारुती जमादार, लता कांबळे, पोलीस पाटील दीपक कांबळे, आरोग्य सेविका ए.बी. माळी, अंगणवाडी आणि आशा कर्मचारी उपस्थित होत्या.