सांगली : पल्स पोलिओ लसीकरण मोहीम येत्या १७ जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे. कोेरोना संसर्गाचा विचार करता त्याबाबत विशेष खबरदारी घेण्यात यावी. लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहणार नाही, यासाठी सर्वतोपरी दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत कदम बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कदम म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला ही लस देण्यासाठी नियोजन करावे. दुर्गम गावे, वाड्या-वस्त्यावरील कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. कोविड-१९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व बुथवर आवश्यक ती दक्षता घ्यावी. बुथवर गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन आदी बाबींबाबत दक्ष रहावे. सॅनिटायझेशन, थर्मल गन आदी आवश्यक साहित्याची कमतरता भासू नये यासाठी खबरदारी घेऊन लसीकरण माेहीम यशस्वी करावी.