शिराळा : शिराळा तालुक्यात कंटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करा, बाहेर फिरणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांविरुद्ध गुन्हे दाखल करा, तसेच वेळप्रसंगी ग्राम समितीला नोटीस बजावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. यावेळी त्यांनी नागरिकांची माहिती घेण्यासाठी जाणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी आदींनी सहकार्य करावे, तसेच जनजागृती करावी, असे आवाहन केले.
शिराळा येथील तहसील कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगराध्यक्षा सुनीता निकम, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डुडी म्हणाले, गावनिहाय कमिट्या कार्यान्वित करणे आवश्यक आहे. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी करा, होम आयसोलेशन तसेच संस्था विलगीकरणामध्ये असणाऱ्या नागरिकांबाबत सतर्क राहा, बाधित रुग्ण बाहेर फिरताना दिसले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, याबाबत ग्रामसमिती सहकार्य करत नसेल तर त्यांनाही नोटीस बजावा, आशा, अंगणवाडी सेविकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जनजागृती करा, भेटी द्या. कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या नागरिकांची ऑक्सिजन, ताप याची तपासणी करा, नंतरच लस द्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सम्राटसिंह नाईक, डॉ. प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, डॉ. डी. बी. निर्मळे, मुख्याधिकारी योगेश पाटील, डॉ. अनिरुद्ध काकडे, उपसभापती बाळासाहेब नायकवडी, डॉ. जे. के. मोमीन, डॉ. गणेश राजमाने आदी उपस्थित होते.
चौकट
शहरात तीन ठिकाणी लसीकरण
आमदार मानसिंगराव नाईक यांनी, या ठिकाणी शासकीय यंत्रणा चांगले काम करत आहे. मात्र व्हेंटिलेटरची अडचण आहे. त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. तसेच नादुरुस्त व्हेंटिलेटरची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ट्यामी फ्लू आदी औषधे उपलब्ध करावीत असे सांगितले.
शिराळा शहरात लसीकरणासाठी तीन ठिकाणी व्यवस्था करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.