लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जागतिक आरोग्य संघटना व भारतीय वैद्यकीय संंशोधन परिषदेने कोरोनाची तिसरी लाट येत्या दोन महिन्यांमध्ये येण्याची शंका वर्तविली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन कोटेकोरपणे करावे, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
सांगलीच्या शंभर फुटी रस्त्यावर श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटल व डॉ. भबान रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, डॉ. दिनेश भबान, डॉ. निरज भबान, राजगोंडा पाटील, जितेंद्र जैन आदी उपस्थित होते.
यड्रावकर म्हणाले, शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी डॉक्टरही कोरोनाविरूध्दच्या लढ्यासाठी सेवा देत आहेत. ऑक्सिजन, लसीकरणावर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे. केंद्र सरकारने राज्याला लसीचा कोटा ठरवून दिला आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविण्याबाबत अडचणी येत आहेत. तरीही लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे लसीचा कोटा वाढवून देण्यासाठी विनंती केली आहे. लसीची उपलब्धता पुरेशा प्रमाणात झाली तर निश्चितपणे कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी चांगल्या पध्दतीने काम होईल. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटलने केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे.
सुरेश पाटील म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी व लसीकरणाची गती वाढविण्यासाठी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामधून १८ वर्षावरील सर्वांना कोविशिल्ड लस शासकीय दराने देण्यात येणार आहे. लसीकरण नोंदणीसाठी नेमिनाथ नगर येथील सांगली ट्रेडर्स सोसायटी, सांगली ट्रेडर्स चेंबर ऑफ कॉमर्स मार्केटयार्ड आदी पाच ठिकाणी सोय करण्यात आली आहे. याठिकाणी नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर लसीच्या उपलब्धतेनुसार लस घेण्यासाठी नागरिकांना बोलविण्यात येईल.
भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. स्वागत डॉ. निरज भबान यांनी केले. राजगोंडा पाटील यांनी आभार मानले.