कोकरूड : पाचगणी (ता. शिराळा) येथे उपसरपंच प्रकाश पाटील (वय ४५) व त्याची पत्नी विमल यांनी ग्रामपंचायतीकडील शिपाई दगडू पाटील यांना सोमवारी लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत कोकरूड पोलिसात फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी उपसरपंच प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले आहे. दगडू कांबळे हे सहा महिन्यांपूर्वी कामानिमित्त मुंबईला स्थायिक होते. गावाकडे उपसरपंच प्रकाश पाटील याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा कानी पडल्यानंतर, मुंबईतील कामधंदा सोडून ते गावाकडे पाचगणीला परत आले. त्यांनी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरी सुरू केली. यादरम्यान उपसरपंच पाटील याच्याशी त्यांची नेहमीच वादावादी होत असे. प्रकाश हा आपल्या पत्नीशी मोबाईलवरून संपर्कात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती नातेवाईकांना देऊन पत्नीला माहेरी पाठवून दिले. या प्रकारानंतर प्रकाश व दगडू यांच्यातील तणाव आणखी वाढला. दगडू वारंवार शिवीगाळ करीत असल्याची तक्रार प्रकाशने कोकरूड पोलिसात दिली. हा प्रकार समजल्यानंतर सोमवारी जाब विचारण्यासाठी गेलेल्या दगडू यांना प्रकाश व त्याची पत्नी विमल यांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. मारहाणीत दगडू यांचा उजवा पाय मोडला असून कानाजवळ गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत कोकरूड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, प्रकाश पाटील यास अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)
उपसरपंचाकडून कर्मचाऱ्यास मारहाण
By admin | Published: July 14, 2015 12:41 AM