आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यात शंभर टक्के संप यशस्वी करण्यात आला.
सिटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या देशव्यापी हाकेनुसार जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक २४ मे रोजी एकदिवसीय संपावर होत्या, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाच्या महामारीमध्ये जिवाची पर्वा न करता तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक विविध मागण्या घेऊन सतत रस्त्यावरची लढाई लढत आहेत. परंतु त्यांच्या प्रश्नाकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे आशा व गटप्रवर्तकांमध्ये नाराजी आहे.
केलेल्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही. अनेक आशा सेविकांचा कोरोनाने मृत्यू होऊनही त्यांना अद्याप पन्नास लाख रुपये विमा लागू करून अर्थसहाय देण्यात आलेले नाही. अशा अनेक मागण्यांबाबत संप करण्यात आला. हा संप यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्षा मीना कोळी, सचिव कॉ. उमेश देशमुख, हणमंत कोळी, सुरेखा जाधव, अंजू नदाफ, शबाना आगा, सुवर्णा सणगर, मंजुषा साळुंखे, मयुरा पारथनळी यांनी परिश्रम घेतले.