लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा शुक्रवारी दुसऱ्यादिवशी जिल्ह्यात भडका उडाला. वाळवा, तासगाव, पलूस, मिरज, आटपाडी, कडेगाव, खानापूर तालुक्यांत दूध व भाजीपाला वाहतूक रोखण्यात आली. गावोगावचे आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले. भाजीपाल्याची आवक घटली असून, शेतकऱ्यांनी दूध केंद्रांवर दूध न घालता त्याचे लोकांना वाटप केले, तर काही ठिकाणी ते ओतून दिले. सहकारी संस्था व खासगी संकलन केंद्रांवर दुधाची दीड लाख लिटरने घट झाली असून, १३ लाख लिटर दूध पडून आहे.वाळवा तालुक्यात साडेतीन लाख लिटर संकलन होणारे दूध केवळ १ लाख ७६ हजार लिटरवर आले. राजारामबापू दूध संघाकडील शिल्लक राहिलेले अंदाजे एक लाख लिटर दूध पोलिसांच्या बंदोबस्तात पुणे येथे तीन व मुंबईकडे पाच टँकरमधून पाठविण्यात आले. विट्यात भाजी मंडईत व्यापाऱ्यांकडील भाजीपाला खरेदी करण्यासाठी शुक्रवारी तुरळक गर्दी होती. खानापूर तालुक्यातील सर्व दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. गोटखिंडी (ता. वाळवा), देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. कवठेमहांकाळ तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.सकाळी कवठेएकंद (ता. तासगाव) येथे शेतकऱ्यांनी दुधाची वाहतूक करणारी वाहने रोखली. अडविलेले सुमारे हजार लिटर दूध गरजूंना वाटण्यात आले. गोटखिंडी फाटा (ता. वाळवा) येथे दूध व भाजीपाला वाहतूक करणारी वाहने अडवून आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतले. यावेळी आंदोलक व दूध वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. बावची फाट्यापासून काही अंतरावर भाजीपाला वाहतूक करणारे वाहन अडवून त्यातील भाजीपाला रस्त्यावर टाकण्यात आला. पलूस तालुक्यात आठवडा बाजार बंदची हाक दिली. पलूस मार्केट यार्डमधील होणारे सौदे बंद ठेवून व्यापारी व इतर संघटनांनी संपास पाठिंबा दिला. रामानंदनगरमध्ये आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला. काही ठिकाणी दूध संकलन झाले होते. त्याचे लोकांना वाटप करण्यात आले. अंकलखोप (ता. पलूस) परिसरात दूध संकलन केंद्रे बंद होती. शनिवारी काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे कृष्णाकाठची गावे बंद ठेवली जाणार आहेत.मिरज पूर्व आणि पश्चिम भागातून दररोज मुंबई, हैद्राबादला जाणारा पन्नास टन भाजीपाला शुक्रवारी पाठविण्यात आला नाही. ढबू मिरची, कोबी, मिरची, झेंडूची फुले यांचा त्यात समावेश आहे.चौकटपुतळ्याचे दहनचोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतकरी संपास पाठिंबा तसेच येवला येथे शेतकऱ्याला अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रवक्ते माधव भंडारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोड्याने मारून त्याचे दहन करण्यात आले. चुडेखिंडी, कदमवाडीतील व्यवहार बंद होते. दूध संकलनात सव्वालाख लिटरने घट, १३ लाख लिटर पडूनसंपाच्या पहिल्यादिवशी जिल्ह्यातील सहकारी दूध संस्था व खासगी दूध संकलन केंद्रात १४ लाख ४० हजार लिटर दुधाचे संकलन झाले होते. हे सर्व दूध विक्रीस पाठविले आहे. शुक्रवारी मात्र त्यात एक लाख ३० हजार लिटरची घट झाली आहे. १३ लाख दहा हजार लिटर दुधाचे संकलन झाले आहे, पण शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने हे दूध प्रत्येक गावांतील संकलन केंद्रांतच अडकून पडले आहे.
सांगलीत संपाचा भडका
By admin | Published: June 02, 2017 11:49 PM