संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर परिसरामध्ये महावितरणकडून विद्युत बिलाची जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. बिले न भरणाऱ्या नागरिकांचे कनेक्शन तोडण्याचा इशाराही दिला आहे. यामुळे ग्राहकांची चांगलीच धावपळ उडाली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिले माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते; परंतु या कालावधीमध्ये कोणतीही बिले माफ झाली नाहीत.नागरिकांनीही वीज बिलांची रक्कम भरली नाही. सध्या महावितरणकडे थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रस्त्यांवर उतरून नागरिकांकडून वीज बिलांची वसुली सुरू केली आहे.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी. के. सोनार म्हणाले, नागरिकांनी महावितरणची थकबाकी भरून सहकार्य करावे. नागरिकांनी सध्या ५० टक्के रक्कम भरावी आणि मार्चनंतर ५० टक्के रक्कम भरावी. कोणत्याही प्रकारे विजेची बिले माफ होणार नाहीत.