सांगली : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, वाढीव वीजबिले रद्द व्हावीत यांसह विविध मागण्यांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांची संघर्ष यात्रा मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास सांगलीत दाखल झाली. ही यात्रा आज, बुधवारी जिल्ह्यात जाणार असून कवठेमहांकाळ, तासगाव आणि कासेगाव येथे होणाऱ्या सभेत दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. सांगलीत बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तटकरे यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढली असून, त्याला शेतकऱ्यांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्जमाफी, तूर खरेदीबाबत शासन दिरंगाई करीत आहे. कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तूर खरेदी शासनाने तातडीने सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, आ. जयंत पाटील, आ. पतंगराव कदम, आ. सुमनताई पाटील, आदी नेते या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत. संघर्ष यात्रा बुधवारी सकाळी सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहापासून कवठेमहांकाळकडे रवाना होणार आहे. साडेदहा वाजता कवठेमहांकाळ येथे त्या तालुक्यासह जत येथील शेतकरी, कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. दुपारी एक वाजता तासगाव येथील मार्केट कमिटीजवळ सभा होणार असून, दुपारी अडीच वाजता येळावी फाटा येथे भारती ग्रामीण रुग्णालयात पलूस, कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानंतर यात्रा सायंकाळी वाळवा तालुक्याकडे रवाना होणार आहे. राजारामबापू कारखान्यावर काहीकाळ थांबून नंतर कासेगाव येथील राजारामबापू पाटील यांच्या स्मारकाजवळ येऊन तेथे सभा होणार आहे.संघर्ष यात्रेची सर्व तयारी स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे. स्थानिक दुष्काळी परिस्थिती, रखडलेल्या सिंचन योजना, वीज बिलाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतच्या आकडेवारीचा आढावा घेऊन येथील प्रश्नांवर सभांच्या माध्यमातून चर्चा घडविली जाणार आहे. कासेगाव येथील सभा संपल्यानंतर बुधवारी रात्री यात्रा कऱ्हाडकडे रवाना होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)सदाभाऊ तर भाजपचे आमदार : तटकरेकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा शेतकरी चळवळीशी दुरान्वयेही संबंध राहिलेला नाही. ते शेतकरी संघटनेचे नव्हे, तर भाजपचे आमदार आहेत. विधिमंडळात त्यांनी भाजपचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी संघर्ष यात्रेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी सांगलीत सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीची संघर्षयात्रा रात्री पावणेदहाच्या सुमारास सांगलीत दाखल झाली.
संघर्ष यात्रा आज सांगली जिल्ह्यात
By admin | Published: April 26, 2017 12:13 AM