सहदेव खोत पुनवत : ज्या वयात खेळावे, बागडावे, बालपणीची मौजमजा करावी, शाळेत जाऊन शिक्षण घ्यावं, त्या वयातच नियतीने त्यांना हातात कोयता घ्यायला लावला आहे. दिवसभर कुटुंबासमवेत ऊसतोड करावी. सायंकाळी झोपडीवर परतावं आणि चूल पेटवून पोटापाण्याची तजवीज करावी. पण दिवसभर ऊसतोडी करून थकलेले हात अन् शिणलेलं अंग असतानाही शिक्षणात खंड पडू नये. म्हणून या चिमुकल्या बहिणी एकमेकीसोबत दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात हातात पुस्तक घेऊन समृद्ध भविष्यासाठी शिक्षणाची ज्योत पेटवितात.रात्रीच्या गर्भातून उद्याचा उष:काल होईल अशी सुंदर स्वप्ने रंगवीत त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचे रंग भरले जात आहेत. बीड येथून कुटुंबासमवेत ऊसतोड करण्यासाठी पुनवत (ता. शिराळा) येथे आलेल्या पाच शाळकरी बहिणींची. सौफिया, जीनत, फिरदोस, सादिया व मुस्कान अशी या संघर्षमय जीवन जगणाऱ्या पाच बहिणींची नावे आहेत. चाँद अब्बास शेख हे बीडचे रहिवासी. आपल्या कुटुंबासह गेली पाच वर्षे ते पुनवत येथे ऊसतोड करण्यासाठी येतात. याही वर्षी ते आले आहेत. चाँद यांना पाच मुली व एक मुलगा. कुटुंबात एकूण अकरा माणसं. गावाकडे पोटापुरती जमीन आहे पण तीही कोरडवाहू.त्या मिळकतीत पोट भरत नाही म्हणून चाँद हे गेले पंधरा वर्षापासून ऊसतोड हंगामात आपल्या कुटुंबासह भटकंती करतात. संसाराचा डोलारा सांभाळतात. मात्र संसाराच्या या रहाटगाडग्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची मात्र आबाळ होते . चाँद यांनी आपल्या पाच मुलींना बीडमधील एका नामांकित उर्दू शाळेत शिक्षणासाठी घातले खरे. मात्र परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलींना नियमित शिक्षण देता आलेले नाही. त्यांच्या सौफिया व जिनत या जुळ्या मुली दहावीत, फिरदोस ही आठवीत, मुस्कान ही तिसरीत शिकत आहे तर सादिया हिने दहावीनंतर शिक्षण बंद केले आहे.
तरीही या मुलींना शिकायचंय..आज कुटुंबासमवेत ऊसतोडीसाठी शिराळा येथे राहताना या पाच बहिणींना सकाळी कोयता हातात घेऊन आपल्या वडिलांच्या सोबत ऊसतोड करावी लागते. उसाच्या मोळ्या बांधून डोक्यावरून वाहून ट्रॅक्टर भरावा लागतो. दिवसभर त्यांचं काम सुरू असतं. सायंकाळ झाली की त्या आपल्या कुटुंबासमवेत झोपडीवर परततात. यावेळी मात्र त्यांना आपल्या शिक्षणाची चिंता सतावत राहते. मग त्या आपला मोबाईल हातात घेतात व शाळेच्या व्हाट्सअप ग्रुपवर काय अभ्यास आलाय हे पाहतात. तसेच युट्युब वरून धडे पाहतात. पुस्तक लेखणी हातात घेतात. यावेळी त्यांच्या अवतीभोवती असते ती केवळ तट्ट्याची झोपडी. ना त्यांच्या अभ्यासाला इथे खोली असते. ना टेबल-खुर्ची.ना कुठला .. पण तरीही या मुलींना शिकायचंय.
गरज शासनाच्या मदतीची..नवीन शिक्षण पद्धतीने उद्याचा निपुण भारत घडवत असताना या महाराष्ट्र कन्यांच्या व्यथा कोण जाणून घेणार? यांना गरज आहे शासनाच्या मदतीची. समाजाच्या सहकार्याची. स्थिर जीवनाची व उज्वल आयुष्यासाठी नियमित शिक्षणाची.