सांगली : पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या खूनप्रकरणी हॉटेल ‘रत्ना डिलक्स’चा मालक कुमार ऊर्फ आप्पासाहेब कल्लाप्पा कुमसगे (वय ४९, रा. तीर्थंकर कॉलनी, कुपवाड रस्ता, विश्रामबाग, सांगली) व व्यवस्थापक शब्बीर बाबू नदाफ (५५, बुधगाव, ता. मिरज) या दोघांना अखेर शनिवारी रात्री उशिरा अटक केली. मांटे यांचा मृतदेह हॉटेलबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली.विश्रामबाग येथील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये दारू पिण्याच्या वादातून समाधान मांटे यांचा धारदार हत्याराने १८ वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. मंगळवार, दि. १७ जुलै रोजी रात्री घडलेली ही घटना हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन त्याआधारेच पोलिसांनी तपासाला दिशा दिली होती. याप्रकरणी मुख्य संशयित झाकीर जमादार, त्याचा मेहुणा वासीम शेख, साथीदार अन्सार पठाण व राजू नदाफ यांना अटक केली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. अटकेतील संशयितांची संख्या सहावर गेली आहे. आणखी कोणाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांनाही अटक केली जाईल, असे उपअधीक्षक वीरकर यांनी स्पष्ट केले.मांटे यांचा खून झाल्यानंतर नदाफने कुमसगेला या घटनेची माहिती दिली. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कुमसगेच्या सांगण्यावरून नदाफने वेटरच्या मदतीने मांटे यांचा मृतदेह हॉटेलबाहेर फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तपासातून पुढे आली होती. कुमसगेला शनिवारी सकाळी सात वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर व्यवस्थापक नदाफ व चार वेटरनाही ताब्यात घेतले. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनीही चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा कुमसगे व नदाफला अटक केली. चार वेटरना सोडून देण्यात आले. रविवारी दुपारी कुमसगे व नदाफला न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.अकरा साक्षीदारहॉटेलमधील दोन महिला व नऊ पुरुष असे ११ कामगार या खुनातील महत्त्वाचे साक्षीदार आहेत. हॉटेलमधील बाळकृष्ण शंकर कातकर (४२, आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व साक्षीदार फितूर होऊ नयेत, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. यातील काही साक्षीदारांचे न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे जबाब घेतले जाणार आहेत.