मिरज : मिरजेतील दत्त चाैकात बारावी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. एसटी बसच्या चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. शाफिन समीर पिरजादे (वय १७, रा. सुभाषनगर, मिरज) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने एसटीवर दगडफेक करून काचा फोडल्या. याप्रकरणी बसचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शाफिन पिरजादे हा आज, शनिवारी सकाळी १० वाजता आर्षद नरवाडे व सिद्धिक जाफर यांच्यासोबत बारावीची परीक्षा देण्यासाठी मिरज मार्केटकडे चालत निघाला हाेता. दत्त चाैकात गर्दीत पाठीमागून येणाऱ्या (क्र. एमएच ४० वाय ५०६६) या मिरज-डोंगरवाडी एसटीच्या मागील चाकाखाली शाफिन सापडला. चाक अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या शाफिनला तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अपघातप्रकरणी शहर पोलिसांनी बसचालक ए. एस. खराडे यास ताब्यात घेतले. अपघातानंतर जमावाने पोलिस ठाण्यासमोर बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. शहर पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
Sangli News: बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्याचा बसखाली सापडून मृत्यू, जमावाची एसटीवर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 4:49 PM