सांगली : पलूस तालुक्यातील सावंतपूर वसाहतीमधील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांकडून शालेय पोषण आहाराची भांडी घासण्याचे व शौचालय साफ करण्याचे काम करवून घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिल्हा परिषद सदस्या नीशा पाटील यांनी या प्रकाराची छायाचित्रे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविली. त्याची गंभीर दखल घेत सतीश लोखंडे यांनी मुख्याध्यापिका तथा आदर्श शिक्षिका बीना माने यांच्या निलंबनाचे, तर इतर सात शिक्षकांना नोटिसा बजाविण्याचे आदेश गुरुवारी दिले.जिल्हा परिषदेच्या शाळांत विद्यार्थ्यांना स्वच्छता करण्यास सांगणे, चहा तसेच चहाचे साहित्य आणण्यास लावणे, अशी कामे लावली जातात. मात्र याची फारशी दखल घेतली जात नाही. पलूस तालुक्यातील सावंतपूर वसाहत येथे असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मात्र विद्यार्थ्यांकडून पोषण आहाराची भांडी घासून घेण्याचा प्रकार सुरू होता. जि. प. सदस्या नीशा पाटील यांनी या प्रकाराची छायाचित्रे लोखंडे यांना पाठविली. ही छायाचित्रे पाहून लोखंडे यांनाही धक्का बसला. ही मुले पहिली ते चौथी या वर्गातील आहेत. काही मुलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मुलांकडून शौचालयही साफ करून घेतल्याची माहिती पुढे आली. शाळेची पटसंख्या २७७ असून याठिकाणी १ मुख्याध्यापक व ७ शिक्षक आहेत. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका बीना माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तसेच इतर सात शिक्षकांना निलंबित का करू नये, याबाबतच्या कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याचेही आदेश देण्यात आले. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)हक्कावर गदा....मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी याबाबत संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिलेच आहेत. मात्र मुलांकडून अशी कामे करवून घेणे म्हणजे बालकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी संबंधितांवर, बालकांच्या हक्कावर गदा आणल्याबद्दलही कारवाई करण्यात येणार असल्याचे लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात अन्यत्र असे प्रकार कोठे आढळले, तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा लोखंडे यांनी दिला आहे.नेत्यांना हे उद्योग दिसत नाहीत का?सतीश लोखंडे म्हणाले की, शाळेतील मुलांना भांडी घासणे, शौचालय साफ करण्यास लावणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असे प्रकार कोठे आढळल्यास सरळ आपल्याशी संपर्क साधा, कडक कारवाई करू. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी भांडणाऱ्या शिक्षक संघटनांनी जरा अशा कामातही लक्ष घालावे. आपल्या मागण्यांसाठी अकांडतांडव करणाऱ्यांना हे उद्योग दिसत नाहीत का?
विद्यार्थी घासतात पोषण आहाराची भांडी
By admin | Published: July 02, 2015 11:34 PM