सांगली : राज्यातील वाढते जातीय अन्याय, अत्याचार, ॲट्रॉसिटी केसेसचे वाढते प्रमाण यासह विविध प्रश्नांवर शासनाच्या उदासिनतेविरुद्ध रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्यावतीने शुक्रवार, २ जुलै रोजी डरकाळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिली.
याविषयी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, विशेष सरकारी वकिलांच्या रखडलेल्या नियुक्त्या, पोलीस व राज्य सरकारचे दुर्लक्ष, सामाजिक न्याय विभाग, समाजकल्याणचा भोंगळ कारभार, विद्यार्थी व समाजाचा निधी परत जाण्याचे प्रकार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींवर घाला, मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, मुस्लिम आरक्षण, आदी अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांना इशारा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे डरकाळी आंदोलन करण्यात येणार आहे.