सांगली : दहावीची गुणपत्रके सोमवारी वितरित करण्यात आल्याने मंगळवारी महाविद्यालयात आकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी मंगळवारी शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर पालकांचीही झुंबड उडाली होती. ही प्रवेश प्रक्रिया आता १९ जूनपर्यंत चालणार आहे. अकरावीसाठी १६ ते १९ जूनदरम्यान प्रवेश अर्जांची विक्री व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामुळे शहरातील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, मथुबाई गरवारे महाविद्यालय, जी. ए. कॉलेज, चंपाबेन शहा महाविद्यालय, चिंतामणी महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय आदी ठिकाणी मंगळवारी सकाळपासून गर्दी झाली होती. आज अर्ज स्वीकारण्याची जरी प्रक्रिया सुरु झाली असली तरी, आज केवळ अर्ज वितरितच करण्यात आले. उद्यापासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. अर्ज देणे व स्वीकारणे शुक्रवारपर्यंत चालणार आहे. २० ते २३ जूनपर्यंत प्रवेश अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तपासणी व गुणवत्तेनुसार निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. ही यादी २४ जूनरोजी संबंधित महाविद्यालयाच्या फलकावर लावण्यात येणार आहे. त्यानंतर २५ ते २९ जूनदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश शिल्लक राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ३० जून ते १ जुलै दरम्यान प्रवेश दिला जाणार आहे. पुन्हा रिक्त जागेसाठी व ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना २ ते ३ जुलैपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. अकरावीचे वर्ग ७ जुलैपासून सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)कोणी वंचित राहणार नाहीदहावीच्या परीक्षेस जिल्ह्यातून ६१० शाळांमधील ४२ हजार २३० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र त्यातील ४२ हजार १३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ३९ हजार ७८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेस बसलेल्या २३ हजार ४१९ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ९०७ विद्यार्थी, तर १८ हजार ७१३ विद्यार्थिनींपैकी १७ हजार ८८० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. अकरावी प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर यादव यांनी दिली.
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड
By admin | Published: June 16, 2015 11:06 PM