शिरढोण : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क न भरल्याने नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील नूतन इंटरनॅशनल स्कूलने मंगळवारी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले. सुमारे तीन तास २५ ते ३० विद्यार्थी रखरखत्या उन्हात गेटसमाेर उभे होते.
मंगळवारी सकाळी १० वाजता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी नेहमीप्रमाणे नूतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. पण व्यवस्थापनाने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात येण्यास मज्जाव करून मुख्य प्रवेशद्वारच बंद केले. विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली. काही विद्यार्थ्यांनी तीस टक्के, पन्नास टक्के शुल्क भरले आहे, तर हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी काेणतेही शुल्क भरलेले नाही.
विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्यानंतर काहींनी पालकांना बोलावून घेतले. पालकांनी पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी विश्वास साबळे यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. साबळे यांनी शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी संस्था, प्राचार्य आणि शिक्षकांवर कारवाईची मागणी केली.
लवकरच कारवाई
नूतन इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी शाळेतून बाहेर काढण्यात आले. हे चुकीचे आहे. हा प्रकार मी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना कळविला आहे. लवकरच याबाबत कारवाई हाेईल, असे गट शिक्षण अधिकारी विश्वास साबळे यांनी स्पष्ट केले.