सांगली : वैद्यकीय सर्व शाखांच्या प्रवेशाकरिता महाराष्ट्र राज्य कोट्यातून प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, सीईटी सेलचे संकेतस्थळ वारंवार हँग होत असल्याने व त्याच्या मंदगतीमुळे लाखो विद्यार्थी नोंदणी न करू शकल्याने ‘सलाईन’वर आहेत. महाराष्ट्र सीईटी सेलने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही होत आहे.केंद्रीय कोट्यातून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला यापूर्वीच सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता देशातील राज्यांनी त्यांच्या ८५ टक्के कोट्यातून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रत्येक राज्याने यासाठी त्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रिया नोंदणीला १७ ऑगस्टला सुरुवात झाली. २३ ऑगस्टला नोंदणीची अंतिम मुदत आहे. मंगळवारी, २० ऑगस्टपासून महाराष्ट्र सीईटी सेलचे संकेतस्थळ अंत्यत मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अडचणी येत आहेत. नोंदणीसाठी आता केवळ दोनच दिवस हातात असून, राज्यातील लाखो विद्यार्थी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत.
मुदतवाढीची मागणीनोंदणीची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असताना संकेतस्थळाच्या मंदगतीचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. ही गती पाहता दोनच दिवसांच्या उर्वरित मुदतीत इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी होणे कठीण दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाेंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत असून, केंद्रीय कोट्यातून सुरू असलेली प्रक्रियासुद्धा गतीने होत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील संकेतस्थळाच्या गतीची अडचण दूर होणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीसाठी मुदतवाढही देण्यात यावी. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली