सांगली : जिल्ह्यातील सातशे सोसायट्यांपैकी चारशे सोसायट्यांच्या तोट्याचा अभ्यास सध्या जिल्हा बँकेमार्फत सुरू आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे, अडचणींमुळे ज्या सोसायट्या तोट्यात आहेत त्यांची व मानवनिर्मित चुकांमुळे तोट्यात आलेल्यांची वेगवेगळी यादी करण्यात येत आहे. तोट्यातील सोसायट्यांना नफ्यात आणण्यासाठी गावपातळीवर सोसायट्यांमार्फतच उद्योग उभारणीची योजना बँकेने आखली आहे.
सोसायट्यांमध्ये जी तूट आहे, ती भरून काढण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील फायद्यात असणाऱ्या अनेक सोसायट्यांनी त्यांच्या दैनंदिन कामासह पूरक उद्योग सुरू केले आहेत. झेरॉक्स, पीठाची चक्की यासह अनेक उद्याेग उभे करून त्यातून संस्थेला आर्थिक हातभार त्यांनी लावला. त्यामुळे हाच प्रयोग तोट्यातील सोसायट्यांसाठी सुरू करण्याची योजना बँकेने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सध्या सोसायट्यांचा अभ्यास केला जात आहे. सोसायट्यांच्या तोट्याचा अभ्यास करून त्याचे वर्गीकरण केले जात आहे. त्यानंतर संबंधित सोसायट्यांना मदत केली जाणार आहे.
जिल्हा बँकेमार्फत सोसायट्यांना ११ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सोसायट्यांना सहा टक्के दराने पुरवठा करून पाच टक्के सवलत देण्याचाही विचार आहे. त्यातून सोसायट्यांचा तोटा भरून निघेल. सोसायट्यांमधील ही तूट दूर करून शंभर टक्के सोसायट्या नफ्यात आणण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे.