सांगली : कृष्णा नदीला आलेल्या २००५ आणि २०१९मध्ये महामहापुरानंतर लाल आणि निळी रेषा बदलली आहे. त्यांचा नव्याने अभ्यास करण्यासाठी शासनाने चार कोटी ८३ लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. जलसंपदा विभागाकडून तांत्रिक मंजुरी मिळताच काम सुरू होणार आहे.
सांगलीत १८५३ आणि १८५६, तसेच १९१४मध्ये महापूर आला. त्यानंतर १९६२ आणि २००५मध्ये नंतर २०१९च्या पुराने त्या महापुरांच्या आठवणी ताज्या केल्या. २००५मधील महापुरानंतर सर्वेक्षण झाले होते. त्याचा अहवालही प्रसिध्द झाला आहे. २००५मध्ये लाल आणि निळी रेषा बदलली. २००५ नंतर २०१९मध्ये आलेल्या महापुराची तीव्रता मोठी होती. सांगलीतील आयर्विन पुलाची इशारा पातळी ४० फूट, तर धोका पातळी ४५ फूट आहे. तेव्हा पाणी पातळी ५४.४ फूट झाली होती. ही पातळी सर्वोच्च ठरली होती. नदीजवळ होणारी अतिक्रमणे, ओढे, नाले बुजवून तेथे मोठ्या सदनिका होणे हीच कारणे त्यामागे दिसत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत नदीची लाल आणि निळी रेषा झपाट्याने बदलत असल्याचे दिसत आहे. आता त्यांचा अभ्यास करण्यासाठी चार कोटी ८३ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. याला जलसंपदा विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. तांत्रिक मंजुरी मिळाली की लगेच काम सुरू होणार आहे. कऱ्हाड येथील टेंभू बंधारा ते राजापूर बंधाऱ्यापर्यंतच्या नदीचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये नदीची उंची, लांबी, रुंदी या सर्व गोष्टींचा अभ्यास होणार आहे. त्यानंतर नदीची नवीन लाल आणि निळी रेषा निश्चित होणार आहे.
कोट
कृष्णा नदीच्या २००५च्या महापुराचा अभ्यास होऊन लाल आणि निळी रेषा निश्चित झाली असून, ती ऑनलाईन प्रसिध्दही केली आहे. २०१९च्या महापुराने २००५ची लाल आणि निळी रेषा बदलल्यामुळे त्यांचा अभ्यास होणार आहे. तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू हाईल.
- ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे मंडळ, सांगली.