सांगली : सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ (भारत स्टेज-३) इंजिन प्रकारातील वाहनांवर १ एप्रिलपासून बंदी घातल्यामुळे नामांकित दुचाकी कंपन्यांनी त्यांच्याकडील बीएस-३ प्रकारातील सर्व वाहनांवर इतिहासातील सर्वात मोठ्या सवलतींचा वर्षाव केला. त्यामुळे सांगली, मिरजेतील अनेक शोरुम्स्मध्ये गुरुवारी ग्राहकांची जत्रा भरली. दिवसात पाचशेहून अधिक वाहनांचे बुकिंग झाले असून, शुक्रवारीही अशीच स्थिती राहण्याची चिन्हे आहेत. सांगली, मिरज शहरातील वाहनांवर मोठ्या सवलती जाहीर झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि शोरुम्समध्ये खरेदीसाठी लोक तुटून पडले. गर्दी इतकी वाढली की, शोरुम्समधील कर्मचाऱ्यांना गर्दी नियंत्रित करणे मुश्किल झाले. सांगलीतील मिलेनियम होंडा, पट्टणशेट्टी होंडा, पोरेज् टीव्हीएस, मिरजेतील सिद्धिविनायक या शोरुम्समध्ये सवलती सुरू झाल्यानंतर दिवसभर खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. मुहूर्तावर होणाऱ्या खरेदीचेही विक्रम गुरुवारी मोठ्या सवलतींच्या वर्षावाने मोडीत निघाले. दिवसभर शोरुम्सना जत्रेचे स्वरूप आले होते. वाहने मिळविण्यासाठी ग्राहकांची धडपड सुरू होती. हिरो मोटो कॉर्प आणि होंडा मोटारसायकल अॅण्ड स्कुटर इंडिया या दोन कंपन्यांनी सर्वात मोठ्या आॅफर्स जाहीर केल्या. कंपन्यांनी जाहीर केलेल्या आॅफर्समध्ये पुन्हा स्थानिक विक्रेत्यांनी स्वत:च्या आॅफरची भर घातली आणि वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी तुटून पडले. सात हजार रुपयांपासून २0 हजार रुपयांपर्यंतच्या सवलती दुचाकी वाहनांवर होत्या. दिवसभरात मोपेड प्रकारातील बीएस-३ ची बहुतांश वाहने विकली गेली. मोटारसायकलचा साठा अजूनही शिल्लक आहे. काही शोरुम्सनी या वाहनांच्या माध्यमातून मोठा फटका बसू नये म्हणून वर्षाचा मोफत विम्यासह सेवेमध्ये काही सवलती जाहीर केल्या. सांगलीतील अन्य दुचाकी वाहन विक्रेत्यांनी कंपनीची आॅफर असूनही वाहनांची विक्री केली नाही. गेल्या महिन्याभरात बुकिंग झालेल्या वाहनांचे अजून पासिंग झाले नसल्याने, त्यांनी आॅफरने वाहन विक्री करणे टाळले. तरीही दिवसभर अशा शोरुम्समध्ये ग्राहकांची चौकशी सुरू होती. नेहमी साडेसहा वाजता बंद होणारी शोरुम्स ग्राहकांच्या गर्दीमुळे रात्री आठपर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)
दुचाकींच्या शोरूम्सना सांगलीत जत्रेचे स्वरूप
By admin | Published: March 30, 2017 11:35 PM