पलूस : फॉरेक्स ट्रेडिंगमधील फसवणुकीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी ८ लाखांची मागणी करून दोन लाख रुपये लाच घेताना पलूस पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक महेश बाळासाहेब गायकवाड (वय ३६, रा. सध्या रा. प्रथमेश अपार्टमेंट, तासगाव कराड रोड, पलूस, मूळ रा. केडगाव गावठाण, दौंड, ता. दौंड, जि. पुणे) याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसायदेखील करतात. दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्यावर मारहाणप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ११८(२),११५,१८९(२),१८९(४),१९१(१),१९१(३),१९०,६१(२) नुसार गुन्हा दाखल आहे. दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी तपासानुसार त्यांना संशयित आरोपी केले होते. दि. ०४ जानेवारी २०२५ रोजी तक्रारदार यांना किसान टायर्स पलूस येथून ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. उपनिरीक्षक गायकवाड याने अटकेची भीती दाखवून तक्रारदारांकडे १० लाख रुपये लाचेची मागणी केली. त्याच दिवशी तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन त्यांना अटकपूर्व जामीन करून घ्या, असे सांगून सोडून देण्यात आले होते. दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी तक्रारदार यांना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला. त्यानंतर उपनिरीक्षक गायकवाड याने तक्रारदार यांना समक्ष पोलिस ठाण्यात बोलावले. फोनद्वारे बोलवून घेऊन उर्वरित ८ लाख रुपये देण्यासाठी वारंवार तगादा लावला होता. दि.२५ मार्च २०२५ रोजी तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन उर्वरित ८ लाख रुपयांची व्यवस्था कर, अन्यथा तुझी चारचाकी गाडी गुन्ह्यात जप्त करीन, तसेच फोरेक्स ट्रेडिंगच्या अनुषंगाने तुझी चौकशी चालू आहे, त्यामध्येही तुझ्याविरुद्ध अजून एक गुन्हा दाखल करीन, अशी उपनिरीक्षक गायकवाड याने धमकी दिली. उर्वरित ८ लाख रुपये मागून तडजोडीत दोन लाख रुपये देण्याचे ठरले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून उपनिरीक्षक गायकवाड याला त्याच्या केबिनमध्ये दोन लाख रुपये लाच स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले. उपअधीक्षक उमेश पाटील, हवालदार रामहरी वाघमोडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Sangli: फसवणुकीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी ८ लाखांची मागणी, पलूसमध्ये उपनिरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:49 IST