सांगली : पूर ओसरला असून लोक आपआपल्या गावांकडे परतत आहेत. उध्वस्त झालेली गावे, संसार पुन्हा सावरून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन सुरू करण्यासाठी त्यांचा परिसर, गावे सर्वांगाने सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढे येवून भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.पूरबाधितांना मदत करण्यासाठी शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेच, यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटनाही प्रयत्न करत आहेत. या सर्वांनी एकाच छत्राखाली येवून सुसुत्रपणे मदत केल्यास कोणीही पुरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सामाजिक संस्था, संघटना व प्रशासन यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठक घेतली.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर, महावितरणच्या संचालिका निता केळकर, दिपक शिंदे (म्हैसाळकर), विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पूरबाधितांना मदत करण्यासाठी समाजातील वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पध्दतीने काम करीत आहेत. हे काम एकत्रित व समन्वयाने झाल्यास सर्व पुरबाधितांपर्यंत मदत पोहोचेल त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल कक्ष तयार करण्यात आला आहे. सर्वांनी या कक्षांतर्गत काम करावे, असे आवाहन करून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, पुरबाधितांना मानसिक, आर्थिक आधाराची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली डिझास्टर ग्रुप तयार करण्यात आला असून सर्व संघंटनांनी एका छत्राखाली येवून कामाचे नियोजन केल्यास अधिक सुसुत्रता येईल असे सांगून प्रत्येक पुरबाधित गावासाठी एक अधिकारी नियुक्त केला आहे. गावांच्या पुनर्बांधणीसाठी पुढे येणाऱ्या संस्थेसोबत प्रशासनातर्फे एमओयु करण्यात येईल. एखादे गाव संस्थेने दत्तक घेतल्यानंतर करता येण्यासारख्या बाबींचा करार केला जाईल, असे सांगून मदतीच्या सुयोग्य नियोजनासाठी तसेच अडचणी अथवा मदत हवी असल्यास आपत्ती निवारण कक्षाच्या 9370333932, 8208689681, 0233-2600500, टोल फ्री क्रमांक 1077 या क्रमांकावर संपर्क साधा, आम्ही त्यां नोंदवून घेऊ व संबंधित अधिकाऱ्यांच्यामार्फत त्यांचे निवारण करू असे सांगितले.अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी स्वच्छता, आरोग्य, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, घरे, इमारतींचे सर्व्हेक्षण, शिक्षण, एकात्मिक बाल विकास सेवा आदि क्षेत्रामध्ये एनजीओ, विविध संघटनांमार्फत मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी विविध संस्था, संघटनांनी सर्व सामाजिक संघटना, सर्व एनजीओ यांनी आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनाबरोबर कटिबध्द आहेत. आयटी सर्व्हिसेससह जीवनोपयोगी वस्तू, शालोपयोगी वस्तू, आरोग्य, स्वच्छता, समुपदेशन आदि सर्व क्षेत्रांमध्ये प्रशासनाच्या बरोबर राहून मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.