मिरज : गॅस ग्राहकांना अनुदानित सिलिंडर मिळण्यासाठी मार्चअखेरपर्यंत बॅँकेत खाते उघडण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र बॅँक खात्याचा क्रमांक न दिलेल्या ग्राहकांचे अनुदानित गॅस सिलिंडर जानेवारीपासूनच बंद करण्यात आल्याने प्रतीक्षा यादीवर ठेवलेल्या ग्राहकांची फरफट सुरू आहे.गॅस सिलिंडर अनुदान एप्रिलपासून गॅस ग्राहकांच्या बॅँक खात्यावर जमा होणार आहे. यासाठी प्रत्येक गॅस ग्राहकाला बॅँक खात्याची सक्ती करण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत बॅँकेत खाते उघडून बॅँक खात्याचा क्रमांक गॅस एजन्सीला न कळविल्यास त्या ग्राहकाचे अनुदान बंद करण्यात येणार आहे. गॅस कंपन्यांच्या निर्देशाप्रमाणे डिसेंबरपासून गॅस ग्राहकांनी बॅँक खाते जोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजून दोन महिन्यांची मुदत असताना, गॅस कंपन्यांनी बॅँक खाते क्रमांक नसलेल्या गॅस ग्राहकांना अनुदानित सिलिंडर देणे बंद केले आहे. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीमधील ६० ते ६५ टक्केच ग्राहकांनी बॅँक खाते क्रमांक कळविला आहे. उर्वरित गॅस ग्राहकांची बॅँक खाते, आधार कार्डासाठी धडपड सुरू असतानाच, गॅस कंपन्यांनी १ एप्रिलची वाट न पाहता जानेवारीपासूनच अनुदानित सिलिंडर गॅस एजन्सीना देणे बंद केले आहे. त्यामुळे बॅँक खात्याची पूर्तता न केलेल्या गॅस ग्राहकाला तातडीने बॅँक खाते जोडल्याशिवाय सिलिंडर मिळणार नाही. असे ग्राहक प्रतीक्षा यादीवरच राहणार आहेत. अद्याप अडीच महिन्यांचा अवधी शिल्लक असतानाच अनुदानित सिलिंडर देणे बंद करण्यात आल्याने गॅस ग्राहकांची फरफट सुरू आहे. बॅँक खात्यांची संख्या वाढावी यासाठी प्रत्येक गॅस कंपनीला उद्दिष्ट देण्यात आले. उद्दिष्टपूर्ती तातडीने व्हावी, यासाठी गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी अनुदानित सिलिंडरचे वाटप रोखल्याची माहिती मिळाली. गॅस एजन्सीचालकांनी अनुदानित सिलिंडर ग्राहक प्रतीक्षा यादीवर असल्याचे सांगितले, तर गॅस कंपनीचे अधिकारी हात वर करीत असल्याने गॅसग्राहकांची फरफट सुरू आहे. (वार्ताहर)
अनुदानित सिलिंडरचा पुरवठा मुदतीपूर्वीच बंद
By admin | Published: January 18, 2015 11:56 PM