ओळी : शहरातील बेथेलहेमनगरमध्ये पावसामुळे गटारी तुंबल्या असून, सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे महापालिका क्षेत्रातील उपनगरे, विस्तारित भागाची दैना उडाली आहे. ड्रेनेजच्या कामासाठी खुदाई केलेले रस्ते चिखलात रुतले आहे. अनेक मोकळ्या प्लाॅटमध्ये पाणी साचले आहे. गुंठेवारी भागातील नागरिकांच्या मरणयातना अजूनही कायम आहेत.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसांत शहर परिसरात संततधार सुरू आहे. या पावसामुळे शहरातील शंभर फुटी, श्यामरावनगर, आप्पासाहेब पाटील नगरसह अनेक उपनगरांत पाणी साचले आहे. गुंठेवारी भागात मोठ्या प्रमाणात मोकळे प्लाॅट आहेत. या प्लाॅटमध्ये दरवेळी पाणी साचते. या पाण्याचा निचरा करणारी व्यवस्थाच आजअखेर उभी राहिलेली नाही. श्यामरावनगर परिसरात ड्रेनेजचे काम आठ वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी अनेकदा रस्ते खोदले जात आहेत. आप्पासाहेब पाटील नगर परिसरात सध्या ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे. त्यात पाऊस झाल्याने रस्ते चिखलात रुतले आहेत. या चिखलातूनच नागरिकांना वाट शोधावी लागत आहेत. दरवर्षी पावसाळी मुरुमाची मागणी होते, पण हा मुरुमही मातीतच जातो. यंदाही मुरुमासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. काही भागांत मुरुम टाकण्यात आला, पण अजूनही बराचसा भागात पावसाळी मुरुम पोहोचलेला नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उपनगरांतील नागरिकांची दैना उडाली आहे.
चौकट
बेथेलहेमनगरमध्ये सांडपाणी घरात
बेथेलहेमनगरमध्ये पावसामुळे गटारी ओव्हरफॉल होऊन सांडपाणी रस्त्यावर आले. अनेक नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरल्याने दुर्गंधी पसरली आहे. नगरसेविका सविता मदने यांनी आयुक्तांकडे तक्रार केली. या भागातील नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्यानेच सांडपाणी रस्त्यावर आल्याचा आरोपही त्यांनी केला.