लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट पायाखाली घेणारे महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांनी अद्वितीय यश आईला समर्पित केले आहे. तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झाले होते. एव्हरेस्टवर चढाई करतेवेळी आईच्या छायाचित्राचा फलक सोबत नेला होता, शिखरावर सर्वोच्च स्थानी पोहोचल्यावर तिरंग्यासोबत तोही फडकविला.
पडवळवाडी (ता. वाळवा) येथील रहिवासी असणारे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी रविवारी (दि. २३) सकाळी साडेसहा वाजता एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. हा दिवस सर्वोच्च स्वप्नपूर्तीचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले. शिखरावर पोहोचण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ही स्वप्नपूर्ती जशी सर्वोच्च आनंददायी आहे, तसेच माझ्यासाठी वेदनादायीदेखील आहे. आईचे तीन वर्षापूर्वी अल्प आजाराने निधन झाले. तिचे आजारपण वेळीच ओळखता आले नाही. याचे शल्य मनात आयुष्यभर कायम आहे. तिच्या निधनानंतर कोणताही धार्मिक विधी केला नाही, पण संपूर्ण शरीराला वेदना देणारे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केला. एव्हरेस्टवर यशस्वी चढाई हाच एकमेव संकल्प या क्षमतेचा होता. तो यशस्वी करताना आईच्या त्यागाची, समर्पणाची, मातृत्वाची पदोपदी आठवण होत राहिली.
चौकट
चार दिवसांत महाराष्ट्रात परतणार
दरम्यान, एव्हरेस्टवरून उतरल्यानंतर अद्याप ते नेपाळमध्येच काठमांडू येथे थांबून आहेत. मुंबईसाठी विमान मिळताच परतणार आहेत. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करणारे दूरध्वनी अखंडपणे त्यांच्या कुटुंबीयांना येत आहेत. पोलीस दलातूनही गुरव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.