इस्लामपूर : येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील विद्यार्थिनींनी तालुका पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत विविध क्रीडा प्रकारात मिळवलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी काढले. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे सहसचिव व प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रतीक पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील मुलींमध्ये असणारे क्रीडागुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन व सुविधा महाविद्यालयामार्फत उपलब्ध करून दिल्यामुळेच ‘कुसुमताई कन्या’चे नाव देशपातळीपर्यंत पोहोचले आहे. विशेषत: व्हॉलिबॉल आणि कबड्डीच्या सांघिक खेळात थाळीफेक, उंचउडी व बॉक्सिंग या वैयक्तिक क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थिनी चमकल्या आहेत. यावेळी त्यांनी व्हॉलिबॉल मैदान, इनडोअर स्टेडियम, कबड्डीसाठी असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट व इतर सोयी-सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनी खेळाडूंशी संवाद साधला.
शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शरद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षक प्रा. डॉ. संगीता पाटील यांनी आभार मानले. यावेळी एन. आय. एस. प्रशिक्षक अजित शेळके उपस्थित होते.
यावेळी विविध क्रीडा प्रकारात यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा प्रतीक पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
फोटो - १२०२२०२१-आयएसएलएम-कुसुमताई न्यूज
इस्लामपूर येथील कुसुमताई कन्या महाविद्यालयात प्रतीक पाटील यांचा प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. शरद पाटील, प्रा. डॉ. संगीता पाटील, अजित शेळके उपस्थित होते.