संतोष भिसेसांगली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाने प्रमोद चौगुलेला पाचवेळा हुलकावणी दिली; पण त्याने जिद्द कायम ठेवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत थेट राज्यात पहिला येण्याचा पराक्रम केला. त्याच्या यशाने आभाळ ठेंगणे झालेले चौगुले कुटुंबीय शनिवारी दिवसभर गुलाल अन् कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघाले होते. सांगलीत शनिवारी शामरावनगरमधील प्रमोदच्या घरात दिवाळीचे वातावरण होते. घरभर हारतुरे, बुके आणि मिठाईंचे बॉक्स भरले होते. अतिवरिष्ठ अधिकारी पदाच्या वेशीवर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्या अभिनंदनासाठी अनेक राजपत्रित अधिकारी घरी येऊन गेले. एमपीएससीतील अद्वितीय यशाचा आनंद प्रमोदने साधेपणाने साजरा केला. ‘लोकमत’शी संवाद साधतानाही गेल्या पाच-सात वर्षांतील कष्टाचे प्रतिबिंब चेहऱ्यावर जाणवत होते. तो म्हणाला, ‘यूपीएससीच्या परीक्षेत पाचवेळा अपयश आले, मर्यादा संपल्यानंतर नाद सोडला, पण त्याचा फायदा राज्य सेवा परीक्षेसाठी झाला. पाया पक्का झाला. मुलाखतीपर्यंत आत्मविश्वास कायम राहिला.’ ‘घरची जबाबदारी अभियंता पत्नी प्रेरणाने सांभाळली. ती पुण्यात नोकरीस असल्याने मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आले. यादरम्यान, मी देखील अर्थार्जनासाठी काही दिवस मुलांना शिकविण्याचे काम केले. प्रेरणाचा भाऊ प्रदीपही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. गतवर्षी यशस्वी ठरला. सध्या उपजिल्हाधिकारी पदाचे प्रशिक्षण घेतोय. मला मात्र एका गुणाने यशाने हुलकावणी दिली. त्याची कसर यावर्षी भरून काढली. यशाची खात्री होती; पण राज्यात पहिल्या क्रमांकाने बाजी मारण्याची भावना नव्हती. पसंतीक्रम ९ मेपर्यंत कळवायचा आहे. यादरम्यान आणखी एक मुख्य परीक्षा देत आहे. त्यातही यशाने साथ दिली, तर उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळू शकेल. या वाटचालीत वडील बाळासाहेब, आई शारदा, भाऊ आकाश यांची साथ मिळाल्याचे प्रमोदने सांगितले.
सोनीमध्ये मिरवणूकसोनी या त्यांच्या मूळ गावीही जल्लोष आणि आतषबाजी झाली. अभिनंदनासाठी गावकऱ्यांची दिवसभर रीघ होती. सायंकाळी संपूर्ण चौगुले कुटुंबीयांची सोनीकरांनी जल्लोषात सवाद्य मिरवणूक काढली. प्रमोदने सोनीचे नाव राज्यात चमकविल्याचा अभिमान गावकऱ्यांच्या मनात होता.