कोरोना लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम मिरज तालुक्यातील सांगली-इस्लामपूरसह कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली. त्यानंतर डुडी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, मिरज पंचायत समितीचे उपसभापती दिलीपकुमार पाटील उपस्थित होते.
डुडी म्हणाले, दुसऱ्या टप्प्यामध्ये आघाडीवर काम करणाऱ्या पोलीस, महसूल विभाग, इतर शासकीय विभाग, बँक कर्मचारी, आशा वर्कर्स, आदींना लसीकरण करण्यात येणार आहे. दोन डोस देण्यात येणार आहेत. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेमध्ये कॉल सेंटर उभे करून देण्यात येणार आहे.
रंगीत तालमीमध्ये तीन विभाग करण्यात आले. पहिल्या विभागामध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. आरोग्य विभागातील २५ कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली. दुसऱ्या विभागामध्ये आधार नोंदणीची सत्यता पडताळणी करून लस देण्याचे प्रात्यक्षिक घेतले. तिसऱ्या विभागामध्ये रिकव्हरी रूमची व्यवस्था केली असून लस दिल्यानंतर त्या व्यक्तीस अर्धा तास थांबवून कोरोनाबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. लसीकरणानंतर रुग्णास काही त्रास होत असेल तर तातडीने उपचार करण्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्थाही केली आहे. ही लस घेतलेल्यांचे आधार लिंकिंग होणार आहे.
चौकट
इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात प्रारंभ
इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात ड्राय रनचा (रंगीत तालीम) प्रारंभ प्रतीक जयंत पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. बी. कांबळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख यांची उपस्थिती होती.