ओळ : अगस्तीनगर (ऐनवाडी) येथे सोमवारी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व अगस्ती ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची दारे खुली केली. त्याचा फायदा स्त्री स्वावलंबानासाठी होऊ लागला आहे. केवळ चूल आणि मूल ही संकल्पना आता लोप पावली असून आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांचा सर्वच क्षेत्रांत होत असलेला यशस्वी प्रवास कौतुकास्पद असल्याचे मत आटपाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया ऐवळे यांनी व्यक्त केले.
खानापूर तालुक्यातील अगस्तीनगर (ऐनवाडी) येथील अगस्ती विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. सुप्रिया ऐवळे बोलत होत्या. या वेळी औषधनिर्मात्या प्रियांका साळुंखे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, मुख्याध्यापक संतोष नाईक उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व अगस्ती ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष नाईक यांनी अगस्ती विद्यालयाचे शैक्षणिकसह सामाजिक कार्यातील योगदान विशद करून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे असलेल्या स्त्रीची भूमिका सांगितली.
त्यानंतर विद्यालयातील श्रेया साळुंखे, आदिती पवार व प्रियांका जगदाळे या विद्यार्थिनींनी ‘आजची स्त्री व तिची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी सहशिक्षक व्ही.बी. कबीर, व्ही.बी. खाडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.